कांदा (Photo Credit : ThoughtCo)

शेतात कष्ट करून शेतमाल बाजारात विकल्यानंतर शेतकऱ्याच्या (Farmers) हातात काय उरते हा एक मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असतानाही आजही अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळू शकलेला नाही. असाच एक प्रकार कर्नाटकातून (Karnataka) समोर आला आहे. येथे गदग जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने 415 किमीचा प्रवास करून, बंगळुरूच्या मंडईत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु बंगळुरूच्या यशवंतपूर मंडईत 205 किलो कांदा विकल्यानंतर, त्याला अवघे 8.36 रुपये मिळाले.

या घटनेने हताश झालेल्या शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गदग जिल्ह्यातील पावडेप्पा हलिकेरी हे बंगळुरूमधील यशवंतपूर मंडईत कांदा विकण्यासाठी गेले होते, तेव्हा येथील घाऊक विक्रेत्याने 200 रुपये प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी केला. यानंतर घाऊक विक्रेत्याने शेतकऱ्याच्या नावे पावती तयार केली, ज्यामध्ये मालवाहतूक शुल्क 377 रुपये आणि कांदा उचल शुल्क 24 रुपये होते. या सर्वांचा खर्च वजा केल्यावर शेवटी शेतकऱ्याच्या हातात फक्त 8 रुपये 36 पैसे आले.

शेकडो किलोमीटरचा प्रवास करूनही शेतकऱ्याच्या पदरी अशाप्रकारची निराशा पडल्यानंतर त्याने इतर शेतकऱ्यांनाही कर्नाटकातील मंडईत कांदा विकण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पावडेप्पा हलिकेरी म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी देखील बंगळुरूच्या यशवंतपूर मंडईत त्यांचा कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. या शेतकर्‍यांचे पीक चांगले आले तर त्यांना चांगला भाव मिळतो, पण अचानक कांद्याचे भाव इतके खाली येतील, असे कुणालाच वाटले नव्हते. (हेही वाचा: India's GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावला; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 6.3 टक्क्यांवर)

गदग आणि उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल सावध करण्यासाठी आपण पावती सोशल मीडियावर शेअर केल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याचे उत्पादन बाजारात नेण्यासाठी त्यांनी स्वतः 25,000 रुपये खर्च केले होते. दरम्यान, कर्नाटकातील अनेक भागात शेतकऱ्यांना हवामानाच्या अनियमिततेचा सामना करावा लागला, ज्यामुळे उत्पादन व परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गदग जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी झाली असून, कांद्याचा आकारही लहान राहिला, त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळाला नाही.