अॅडम हॅरी (Adam Harry), 2019 मध्ये देशातील पहिला ट्रान्सजेंडर ट्रेनी पायलट (India's First Trans Pilot) म्हणून तो समोर आला होता. व्यावसायिक पायलट होण्यासाठी त्याला केरळ सरकारचा सपोर्टही मिळाला होता. परंतु आता दोन वर्षांनंतर हॅरी पायलट होण्याऐवजी झोमॅटोचा डिलिव्हरी पर्सन बनला आहे, कारण नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानुसार, जोपर्यंत हॅरी हार्मोन थेरपीवर आहे तोपर्यंत तो उड्डाण करण्यास पात्र नाही. द हिंदूच्या वृत्तानुसार, हॅरीने खासगी पायलट लायसन्सची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्याला 2017 मध्ये जोहान्सबर्गमध्ये खासगी पायलटचा परवानाही मिळाला.
केरळ सरकारने त्याला 22.34 लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. नंतर जानेवारी 2020 मध्ये तिरुवनंतपुरममधील राजीव गांधी अकादमी फॉर एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये व्यावसायिक पायलट परवान्यासाठी नोंदणी केली. जेव्हा हॅरीने क्लास 2 ची वैद्यकीय परीक्षा दिली तेव्हा एका समस्या आली. हॅरीला जन्मतःच स्त्री घोषित करण्यात आले होते, त्यामुळे त्याने महिला म्हणून अर्ज दिला होता. मात्र अधिकाऱ्यांसमोर त्याने स्वत:ची ओळख ट्रान्स मॅन म्हणून केली. DGCA वैद्यकीय परीक्षेत नॉन-बायनरी लिंगाचा पर्याय नव्हता. सायकोमेट्रिक चाचणीत हॅरीला अनफिट घोषित करण्यात आले.
DGCA ने त्याला लिंग डिसफोरिया (जन्माच्या वेळचे लिंग आणि सध्याचे लिंग जुळत नसणे) या कारणास्तव त्याला अपात्र ठरवले. तसेच जर त्याला 'क्रॉस सेक्स हार्मोन थेरपी' घ्यायची असेल तर याबाबतचे पूर्ण वैद्यकीय उपचार करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. बेंगळुरूच्या इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिनमध्ये हॅरीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हॅरी सध्या ‘क्रॉस सेक्स हार्मोन थेरपी’ घेत आहे. अधिकार्यांनी आता हॅरीला हार्मोन थेरपी पूर्ण करून वैद्यकीय चाचणीसाठी पुन्हा अर्ज करण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Bihar Shocker: खासगी कोचिंग शिक्षकाची 5 वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण; बेशुद्ध मुलावर रुग्णालयात उपचार सुरू)
याबाबतच्या अनुभवाबाबत तो म्हणाला, ‘अधिकारी ट्रान्सफोबिक होते आणि माझ्या शरीराबद्दल अतिशय वैयक्तिक प्रश्न विचारत होते. जसे की मी कोणाशी लग्न करणार वैगैरे. मला सांगण्यात आले की, मला नोकरी देऊन 200 लोकांचा जीव धोक्यात घालता येणार नाही.’