कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाचा जवळ जवळ प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या दरम्यान भारताची अर्थव्यवस्थाही (Indian Economy) ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर नीती आयोगाच्या (NITI Aayog) उपाध्यक्षांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठा दावा केला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी म्हटले आहे की, 2021-22 मध्ये आपली अर्थव्यवस्था 10% च्या दराने वाढेल. पुढील वर्षाच्या अखेरीस आपण कोविड-पूर्व पातळीवरील विकास साध्य करू, असेही ते म्हणाले. चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या चौथ्या तिमाहीत वाढ सकारात्मक होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
2020 हे वर्ष भारतासोबत संपूर्ण जगासाठी बऱ्याच मोठ्या समस्या घेऊन आले. यामध्ये सर्वात मोठी समस्या होती ती कोरोना विषाणूची. या साथीमुळे भारत तसेच इतर अनेक देशांमधील विकासाची गती स्थिर झाली. भारतामध्ये एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीमध्ये 24 टक्के घट झाली होती. मात्र अनलॉकदरम्यान अनेक आर्थिक घडामोडी सुरु झाल्यांनतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास सुरुवात झाली. यापूर्वी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले होते की, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपीचा विकास दर सकारात्मक होईल.
इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या स्वामिनाथन एस. अंकलेसरिया अय्यर यांच्या लेखात असे सांगितले गेले आहे की, 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वात मोठी तेजी अपेक्षित आहे. स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, एकदाका भारतामध्ये लसीकरण सुरू झाले, की त्यानंतर, जगासह भारतामध्ये आर्थिक क्रिया अधिक तीव्र होतील. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे क्रूड तेलाची वाढती किंमत हे आहे. (हेही वाचा: 2 जानेवारी पासून देशातील सारी राज्यं, केंद्र शासित प्रदेशात कोविड 19 लसीच्या ड्राय रनला होणार सुरूवात)
कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनीचे हेड-इक्विटी हेमंत कानवाला मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, आर्थिक क्रियाकलाप पुन्हा सुरु झाल्यावर 2021 मध्ये जागतिक अर्थव्यव्यवस्थेत सुमारे 5 टक्के दराने वाढ अपेक्षित आहे, ज्यामध्ये भारत आणि चीन विकसित देशांपेक्षा वेगाने वाढतील.