सध्या भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (Indian Economy) आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात 2030 पर्यंत, भारत जपानला मागे टाकून $7,300 अब्ज जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. यासह ती आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. S&P ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंगने सोमवारी आपल्या नवीनतम खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (PMI) मध्ये ही बाब नमूद केली.
अहवालानुसार, 2021 आणि 2022 या दोन वर्षांच्या वेगवान आर्थिक वाढीनंतर, 2023 आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्थेने मजबूत वाढ दर्शविली. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन मार्च 2024 ला संपणाऱ्या आर्थिक वर्षात 6.2-6.3 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. यासह, भारतीय अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असेल. एप्रिल ते जून या तिमाहीत आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारताचा विकास दर 7.8 टक्के होता. S&P Global ने सांगितले की, देशांतर्गत मागणीतील मजबूत वाढीमुळे 2024 पर्यंत सतत जलद विस्ताराचा अंदाज आहे.
भारताचा जीडीपी यूएस डॉलरमध्ये मोजल्या जाणार्या सध्याच्या किंमतींवर, 2022 मधील $3500 अब्ज वरून, 2030 पर्यंत $7300 अब्जपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. आर्थिक विस्ताराच्या या वेगवान गतीमुळे 2030 पर्यंत भारतीय जीडीपीचा आकार जपानच्या जीडीपीपेक्षा जास्त होईल, ज्यामुळे भारत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. (हेही वाचा: DA Hike For Rail Employees: रेल्वेच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ; दसरा झाला गोड!)
दरम्यान, अमेरिका सध्या 25,500 अब्ज डॉलरच्या जीडीपीसह जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. यानंतर 18,000 अब्ज डॉलर्ससह चीन दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि 4,200 अब्ज डॉलर्ससह जपान तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मागच्या वर्षी, 2022 मध्ये भारतीय जीडीपीचा आकार ब्रिटन आणि फ्रान्सच्या जीडीपीपेक्षा मोठा झाला. भारताचा जीडीपी 2030 पर्यंत सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीला मागे टाकण्याची अपेक्षा आहे.