
भारतात 2025 मध्ये सरासरीपेक्षा अधिक मान्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी भविष्यवाणी भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारी (15 एप्रिल) केली. हंगामी पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 105% इतके असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून यामध्ये मॉडेल एरर मार्जिन ±5% आहे. यंदा जशी सरासरीपेक्षा पर्जन्यवृष्टी अधिक आहे, तसाच उन्हाळा देखील आहे. त्यामुळे वाढत्या तापमानासोबत हवेतील कमी होणारी आर्द्रता आणि उन्हाच्या वाढत्या झळा, रोज नवी आव्हाने उभी करत आहेत. जाणून घ्या 2025 साठीचा हवामान अंदाज.
कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका
नैऋत्य मान्सून, जो साधारणपणे 1 जून दरम्यान केरळमध्ये येतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत माघार घेतो, तो भारताच्या अर्थव्यवस्थेत, विशेषतः कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतो. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी आणि व्यापक ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आशादायक भविष्यवाणी देतो. (हेही वाचा, Mumbai Monsoon Arrival Update: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता)
प्रादेशिक पावसाचे चित्र
IMD च्या या अंदाजानुसार, भारतातील बहुतेक भागांमध्ये अनुकूल मान्सून परिस्थिती राहील. मात्र, लडाख, ईशान्य भारत आणि तमिळनाडू या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
‘सरासरीपेक्षा अधिक’ म्हणजे काय?
IMD च्या व्याख्येनुसार, 50 वर्षांच्या सरासरी 87 सेमी (सुमारे 35 इंच) पावसाच्या प्रमाणावर आधारित 96% ते 104% दरम्यानचा पाऊस ‘सामान्य’ मानला जातो. यापेक्षा जास्त पाऊस म्हणजे ‘सरासरीपेक्षा अधिक’.
हवामान घटक: एल निनो व IOD सध्या स्थिर
- पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एल निनो आणि इंडियन ओशन डिपोल (IOD) हे महत्त्वाचे हवामान घटक सध्या स्थिर अवस्थेत आहेत. ही स्थिती मजबूत आणि सुसंगत मान्सूनसाठी अनुकूल मानली जाते.
- एल निनो म्हणजे पॅसिफिक महासागराच्या मध्य व पूर्व भागातील पृष्ठभागीय तापमानात झालेली उष्णता वाढ, जी सामान्यतः भारतातील पावसावर विपरित परिणाम करते.
- इंडियन ओशन डिपोल (IOD) म्हणजे हिंद महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील तापमान फरक. सकारात्मक IOD भारतात अधिक पाऊस आणतो, तर नकारात्मक IOD पावसाचे प्रमाण कमी करू शकतो.
युरेशिया व हिमालयात कमी बर्फाचे प्रमाण
यावर्षी युरेशिया व हिमालयातील बर्फाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे निरीक्षण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, कमी बर्फाच्छादनामुळे मान्सून अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे.
शेतीसाठी सकारात्मक संकेत
हवामान आणि महासागर परिस्थिती सकारात्मक असल्यामुळे, 2025 चा मान्सून शेतीसाठी वरदान ठरू शकतो. विशेषतः खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनासाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. वाढते उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.