Agricopter: आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी शोधलं 'अॅग्रीकॉप्टर'; ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करुन पिकांवार ठेवणार बारीक नजर
Agricopter | mage only representative purpose (Photo credit: File Image)

भारतीय शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान अर्थातच IIT Madras च्या विद्यार्थ्यांनी कृषी पिकांवर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी तसेच पिकांवर बारीक नजर ठेवण्यासाठी एक अॅग्रीकॉप्टर (Agricopter) तयार केला आहे. हे अॅग्रीकॉप्टर एक ड्रोन असून, त्यालाच Agricopter असे नाव देण्यात आले आहे. हे Agricopter अत्यंत स्मार्ट असून, यात वापरण्यात आलेल्या कॅमेरा पिकांबाबत अपडेट देत त्यांच्यावर बारीक नजर ठेवणार आहे. त्यामुळे आपल्या पिकांचा दैनंदिन बदलाबाबत शेतकऱ्याला माहिती मिळणार आहे.

पारंपरीक पद्धतीने पिकांवर कीटकनाशक फवारताना त्यात अनेक अडचणी असतात. उदारहणार्थ अनेक शेतकरी कीटकनाशक फवारताना ते जमीनिवरुन फवारतात. अशा वेळी पिकाच्या सर्वच ठिकाणी ते कीटकनाशक पोहोचण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी हे कीटकनाशक जर आकाशातून फवारले तर ते पिकांच्या सर्व भागात पोहचण्याची शक्यता कैक पटीने वाढते. त्यामुळे Agricopter च्या माध्यमातून पिकांवर कीटकनाशक फवारणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरु शकते. तसेच, कीटकनाशक फवारताना शेतकऱ्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामांपासूनही बचाव होणार आहे.

Agricopter बद्दल बोलताना एयरोस्पेस इंजीनियरिंग विद्यार्थी ऋषभ वर्मा याने सांगितले की, अत्याधुनिक मल्टीस्पैक्ट्रल कॅमेरा हेक्साकॉप्टर ड्रोन हे पिकांच्या आरोग्याबाबत दैनंदिन पाहणी करुन एक अहवाल तयार करते. या अहवालातून जो निष्कर्ष मिळेल त्यानुसार Agricopter मध्ये असलेली प्रणाली आवश्यक असलेल्या कीटकनाशकाची स्वयंचलीतपणे फवारणी करते. ऋषभ वर्मा म्हणाला की, कृषीव्यवस्था हा आमच्या देशाचा कणा आहे. आम्ही अत्याधुनिक ड्रोनमध्ये तंत्रज्ञाचा वापर केला आहे. ज्यामुळे कीटकनाशक स्वयंचलीत पद्धतीने आकाशातून फवारता येते. (हेही वाचा, भारतीय तरुणाने 10 मिनिटात Instargram हॅक करून मिळवले 20 लाखाचे बक्षीस (Watch Video))

दरम्यान, आयआयटी मद्रासच्या तीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने Agricopter चे स्वामित्वही मिळवला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांनी असाही दावा केला आहे की, हे ड्रोन एका वेळेस सुमारे 15 लिटर कीटकनाशक वाहून नेऊ शकते. दरम्यान, Agricopter ड्रोन यशस्वीरित्या कार्यरत झाले तर, देशभरातील शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो.