भारत आणि म्यानमार (Myanmar) सीमेवर दोन महिन्यांपूर्वी मुंडन केलेल्या केसांची मोठी खेप सापडल्याने आंध्र प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले होते. अशी भीती व्यक्त केली जात आहे की, हे केस तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) येथून तस्करी केले जात होते. ही गोष्ट भक्तांच्या भावनांशी निगडीत असल्याने सध्या या मुद्द्याची चर्चा सुरु आहे. पकडलेल्या केसांची किंमत अंदाजे 1.8 कोटी रुपये आहे. चिनी नागरिक भारतातून या केसांची तस्करी करीत आहेत. ह्युमन हेयर एक्सपोर्टर्स आणि प्रोसेसरने खुलासा केला आहे की, चीनी नागरिकांनी हैदराबादला काळ्या बाजाराचा अड्डा बनविले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, म्यानमार आणि चीनमधील आयात शुल्क टाळण्यासाठी चिनी आयातदार अंडर इनव्हॉईसिंगचा (Under Invoicing) अवलंब करीत आहेत. म्हणजेच, खेपांची किंमत किंवा संख्या कमी दर्शवली जात आहे. कोट्यवधी रुपयांचा हा अवैध व्यापार रोखण्यासाठी भारतीय निर्यातदारांनी महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) पत्र देखील लिहिले आहे.
हैदराबाद एअर कार्गोवरून म्यानमारला जाणाऱ्या कच्च्या मानवी केसांच्या शिपमेंट डेटाच्या विश्लेषणामध्ये अंडर इनव्हॉइसिंग उघडकीस आले आहे. तसेच, उर्वरित पैसे हवालामार्फत सोन्याच्या रूपात पाठविले जात असल्याचेही समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोलकाता सीमाशुल्क विभागाने हैदराबाद व इतर प्रांतांना पाठविलेल्या एका अलर्ट नोटमध्ये असे म्हटले आहे की, काही निर्यातदार म्यानमार, बांगलादेश आणि व्हिएतनाममध्ये पाठविल्या जाणाऱ्या मानवी केसांची किंमत कमी दाखवत आहेत. चिनी नागरिक म्यानमारमार्गे केसांची खेप चीनकडे नेत आहेत.
डीआरआयला लिहिलेल्या पत्रात ह्यूमन हेअर अॅन्ड हेअर प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे: 'चीनी आणि कोरियन कारखाने अर्ध प्रक्रिया केलेले केस कायदेशीररित्या भारतातून आयात करीत आहेत. चीनने स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले चिनी केस निर्यात केल्यास त्यांना 9% निर्यात इंसेंटीव्ह मिळतो. आता काही चीनी नागरिकांनी म्यानमारच्या सीमेवरून कच्चे केस तस्करी करण्याचे मार्ग अवलंबले आहेत.'
दरम्यान, मंदिरे आणि चर्चमध्ये गोळा केलेले मानवी केस आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये लिलावात विकले जातात. याव्यतिरिक्त, कच्चे केस घरातून आणि सलूनमधून गोळा केले जातात. एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत 33 कोटी रुपयांच्या कच्च्या मानवी केसांची निर्यात करण्यात आली, अशी माहिती TOI च्या अहवालात देण्यात आली आहे. मात्र एकूण निर्यात झालेल्या केसांची वास्तविक किंमत 25 पट जास्त असेल असा संशय आहे.