Election Commission (File Photo)

मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) राजीव कुमार (Rajiv Kumar) येत्या 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्याने, त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शोध समितीने या महत्त्वाच्या भूमिकेसाठी उमेदवारांची निवड सुरू केली आहे. त्यामुळे भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड (CEC Selection Process) कशी होते? याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. इथे दिलेली माहिती आपण वाचाल तर आपल्या मनातील उत्सुकता कमी होण्यास मदत होईल. तसेच, ही निवड कशी होते, त्याची प्रक्रिया काय याबाबतही माहिती मिळू शकेल.

मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कशी केली जाते?

भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे. ती भारतीय संविधानाच्या कक्षेत येते आणि सर्वोच्च न्यायालय आणि संसदेप्रमाणेच अगदी स्वतंत्र असते. त्यामुळे या संस्थेच्या प्रमुख पदावर निवडली जाणारी व्यक्ती कशी शोधली जाते, त्यांची निवड कशी होते याबाबत काही नियम आहेत. खरे तर पूर्वी, विद्यमान निवडणूक आयुक्तांच्या निवृत्तीनंतर सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना आपोआप सीईसीच्या (CEC) भूमिकेत बढती दिली जात असे. तथापि, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि पदाचा कालावधी) कायदा, 2023 लागू झाल्यानंतर मात्र नियुक्ती प्रक्रिया बदलली. नव्या कायद्यानुसार ही निवडप्रक्रियाही बदलण्यात आली. (हेही वाचा, Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वादात, राहुल गांधी यांचे गंभीर आरोप; ECI, देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ प्रतिक्रिया)

नवीन कायद्याअंतर्गत, निवड प्रक्रियेत अनेक टप्पे समाविष्ट आहेत:

शोध समितीची स्थापना: कायदा मंत्री, वित्त सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांचा समावेश असलेली शोध समिती पाच सचिव-स्तरीय अधिकाऱ्यांना उमेदवार म्हणून निवडते.

निवड समितीचा आढावा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधानांनी नामांकित केलेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांसह, निवडलेल्या उमेदवारांचा आढावा घेते.

अंतिम नियुक्ती: भारताचे राष्ट्रपती निवड समितीच्या शिफारशीनुसार अंतिम नियुक्ती करतात.

निवड प्रक्रियेत कोण सहभागी आहे?

शोध समिती:

  • अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय कायदा मंत्री)
  • वित्त सचिव
  • कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव

निवड समिती:

  • नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान)
  • राहुल गांधी (लोकसभेतील विरोधी पक्षनेते)
  • केंद्रीय कॅबिनेट मंत्री (पंतप्रधान मोदी यांनी नामांकित केलेले)

नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कधी जाहीर केले जातील?

राजीव कुमार यांच्या पदभार सोडण्याच्या एक दिवस आधी, 17 फेब्रुवारी रोजी निवड समितीची बैठक होणार आहे. अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi on Adani Query in US: अदानीवरुन प्रश्न, नरेंद्र मोदी यांचे मौन; राहुल गांधी यांची सडकून टीका)

प्रमुख दावेदार कोण आहेत?

संभाव्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड केलेल्या उमेदवारांमध्ये, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एक प्रबळ उमेदवार मानले जातात. राजीव कुमार यांच्यानंतर ते सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत राहणार आहे. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, शोध समितीने सर्वोच्च पदासाठी पाच नावे अंतिम करण्यापूर्वी 480 हून अधिक उमेदवारांची तपासणी केली.