देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) मंदावत आहे. दिवसागणित समोर येणाऱ्या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी झाली आहे. रिकव्हरी रेट (Recovery Rate) सुधारला आहे. त्यामुळे आशावादी वातावरण निर्माण झाले आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Covid-19 Third Wave) शक्यताही तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नेमकी कशी असेल, किती गंभीर, धोकादायक असेल, याबद्दल नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यासंदर्भात अनेक स्टडीज समोर आले होते. काही रिपोर्टनुसार, कोरोनाची तिसरी लाट अत्यंत गंभीर असेल आणि ती लहान मुलांसाठी ती अतिशय धोकादायक असेल, असे म्हटले आहे. तर काही रिपोर्ट्समध्ये तिसऱ्या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असेल, असे म्हटले आहे.
परंतु, कोविड-19 ची तिसरी लाट, डेल्टा वेरिएंट याबाबत सरकारी पॅनलच्या वैज्ञानिकांचे काय म्हणणे आहे. लसीकरणाने धोका कमी होईल काय, याबाबत या वैज्ञानिकांचे काय मत आहे? या सर्व मुद्दांबद्दल जाणून घेऊया... (COVID-19 Third-Wave: मुंबई मध्ये कसे असेल कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचे स्वरुप? TIFR चा रिपोर्टमधून समोर आली महत्त्वपूर्ण माहिती)
काय म्हणतात सरकारी पॅनेलचे वैज्ञानिक?
कोविड-19 संबंधित नियमांचे योग्य पालन न केल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. परंतु, या लाटेत नोंद झालेल्या रुग्णसंख्येपेक्षा निम्मी रुग्णसंख्या असेल, असे पॅनलमधील एका वैज्ञानिकाने सांगितले.
सूत्र मॉडल किंवा कोरोनाच्या नव्या वेरिएंटवर काम करणाऱ्या मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितेल की, कोरोनाचा नवा वेरिएंट उत्पन्न झाल्यास तिसरी लाट वेगाने पसरु शकते. लोकांची प्रतिकार क्षमता, लसीकरणाचा प्रभाव या गोष्टी दुसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवताना विचारात घेतल्या नव्हत्या, परंतु, या गोष्टींचा विचार करुनच तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात येईल.
कोरोना व्हायरसचे नवे वेरिएंट धोकादायक?
वैज्ञानिकांनी सांगितले की, आम्ही तीन टप्पे बनवले आहेत. एक आशावादी आहे. यात आम्ही मानतो की, ऑगस्टपर्यंत जीवनमान सामान्य असेल आणि कोरोनाचा कोणताही नवा वेरिएंट नसेल. दुसरं मध्यवर्ती आहे. तिसरा टप्पा निराशावादी आहे. याची धारणा मध्यवर्ती पेक्षा भिन्न आहे. यात असे म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये नवे वेरिएंट येईल. जो 25 टक्के अधिक संसर्गजन्य असेल. हा वेरिएंट डेल्टा प्लस नसेल.
तिसऱ्या लाटेत इतकी असेल रुग्णसंख्या:
अग्रवाल यांनी शेअर केलेल्या आलेखानुसार, दुसरी लाट ऑगस्टच्या मध्यापर्यंत स्थिर होण्याची शक्यता आहे आणि तिसरी लहर ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान शिगेला पोहोचू शकेल. शास्त्रज्ञ म्हणाले की, 'निराशावादी' परिस्थिती निर्माण झाल्यास, तिसर्या लाटेत देशातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज 1,50,000 ते 2,00,000 पोहचू शकते.
पुढे ते म्हणाले, ही रुग्णसंख्या मेच्या पूर्वार्धात दुसरी लाट शिगेला असताना नोंद झालेल्या रुग्णसंख्येपेक्षा निम्मी आहे. नवा वेरिएंट आल्यास तिसरी लाट वेगाने पसरु शकते. परंतु, दुसऱ्या लाटेपेक्षा याचा वेग अर्धा असेल. मात्र डेल्टा वेरिएंट संदर्भात काळजी घेण्याची गरज आहे.
लसीकरणाने धोका कमी होईल?
अग्रवाल म्हणाले की, लसीकरण मोहिम जसजशी पुढे जाईल तसतसे तिसर्या किंवा चौथ्या लाटेची शक्यता कमी होईल. आशावादी परिस्थितीत दररोजची प्रकरणे 50000 ते 100000 असू शकतात. त्याचबरोबर विद्यासागर म्हणाले की, तिसर्या लाटेच्या वेळी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रकार कमी होऊ शकतात.
यासाठी त्यांनी ब्रिटनचे उदाहरण दिले. जानेवारीत ब्रिटनमध्ये दररोज 60,000 हून अधिक रुग्ण आणि 1,200 मृत्यूंची नोंद झाली. चौथ्या लाटेत ही संख्या 21,000 पर्यंत खाली आली आणि केवळ 14 मृत्यूच्या नोंदी झाल्या. तसंच रूग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटली. यात लसीकरणाने मोठी भूमिका निभावली, असंही ते म्हणाले.