Covid-19 Third Wave | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) प्रभाव कमी होत आहे. परंतु, डेल्टा प्लस वेरिएंटने (Delta Plus Variant) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. डेल्टा प्लस वेरिएंटमुळे कोविड-19 ची तिसरी लाट (COVID-19 Third-Wave) येणार असल्याचेही बोलले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अनेक स्टडीज समोर आल्या आहेत. यातच आता टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) च्या वैज्ञानिकांनी आपला रिपोर्ट सादर केला आहे. यांच्या रिपोर्टमधील माहिती काहीशी दिलासादायक आहे. मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट गंभीर नसेल, असे यात म्हटले आहे.

TIFR च्या रिपोर्टनुसार, मुंबईमध्ये कोविड-19 ची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी गंभीर असण्याची शक्यता आहे. कारण शहरातील सुमारे 80 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण यापूर्वी झालेली आहे. 1 जून पर्यंत शहरातील 80 टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातून ते बरेही झाले आहेत. अशावेळी तिसऱ्या लाटेत मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट रुग्णसंख्येचा उच्चांक गाठण्याची शक्यता फार कमी आहे. (COVID-19 Third-Wave: डेल्टा प्लस व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्यांना तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे अंटीबॉडीजचा घटता स्तर. टीआईएफआर स्कूल ऑफ टेक्नोलॉजी एन्ड कम्प्युटर सायन्स चे डीन डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग न झालेल्या शहरातील 20 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्यास पुन्हा संसर्ग झालेल्या रुग्णांचे निदान करण्यास मदत होईल.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने मुंबईत थैमान घातले होते. दुसऱ्या लाटेत तर दिवसाला 11 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत होती. अशावेळी ही माहिती मुंबईकरांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.