Inflation (Pic Credit: IANS)

गेल्या दशकभरात देशातील कुटुंबांचा मासिक खर्च दुपटीने वाढला आहे. गेल्या 10 वर्षांत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या घरगुती खर्चात मोठी वाढ झाली आहे. ही माहिती नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) च्या अभ्यासातून प्राप्त झाली आहे, ज्याने ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या कालावधीत देशभरातील घरगुती खर्चाचे सर्वेक्षण केले. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसला त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, 2022-23 मध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबांचा सरासरी मासिक खर्च 3,773 रुपयांवर पोहोचला आहे, जो 2011-12 मध्ये 1,430 रुपये होता. शहरी कुटुंबांबद्दल बोलायचे झाले तर, तर या काळात त्यांचा खर्च सरासरी 2,630 रुपयांवरून 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे.

सर्वेक्षणानुसार, 2011-12 मध्ये शहरी भागातील मासिक दरडोई ग्राहक खर्च (MPCE) 2,630 रुपयांवरून 3,510 रुपयांपर्यंत वाढला. तर ग्रामीण भागात तो 1,430 रुपयांवरून 2,008 रुपयांपर्यंत वाढला. शहरी भागातील सध्याच्या किमतींवरील सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च 2011-12 मधील 2,630 रुपयांवरून 2022-23 मध्ये 6,521 रुपयांपर्यंत वाढला. ग्रामीण भागाबद्दल बोलायचे तर ते 1,430 रुपयांवरून 2,054 रुपयांपर्यंत वाढले आहे. (हेही वाचा: Mumbai Railway Stations: मुंबईतील 20 रेल्वेस्थानकांचे होणार आधुनिकीकरण, पाहा कोणत्या स्टेशनचा आहे समावेश)

मासिक दरडोई ग्राहक खर्च अंदाज हा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या केंद्रीय नमुन्यातील 2,61,746 कुटुंबांकडून गोळा केलेल्या डेटावर आधारित आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 1,55,014 घरे आणि शहरी भागातील 1,06,732 घरांचा समावेश आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस दरवर्षी हे सर्वेक्षण करते. सामान्य माणसाचा खर्च कसा बदलत आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरातील लोकांची खर्चाची पद्धत काय आहे हे शोधणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या सर्वेक्षणात शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत गोष्टींचाही खुलासा करण्यात आला आहे, ज्यावर लोक आता पूर्वीपेक्षा जास्त खर्च करत आहेत.