
सध्या 500 रुपयांची बनावट नोट (Counterfeit 500 Rs Notes) बाजारात आली आहे, जी अगदी खऱ्या नोटेसारखी दिसते. संपूर्ण देशात 500 रुपयांच्या अशा खोट्या नोटांचा प्रसार वाढल्याने केंद्र सरकारने एक अलर्ट जारी केला आहे. या नोटा इतक्या उच्च गुणवत्तेच्या आहेत की, त्या खऱ्या नोटांशी जवळपास एकसारख्या दिसतात, ज्यामुळे त्यांची ओळख करणे कठीण झाले आहे. महत्वाचे म्हणजे बनावट नोटा दर्जा आणि प्रिंटच्या बाबतीत खऱ्या नोटांसारख्याच आहेत, त्यांचा रंग आणि पोतदेखील खऱ्या नोटांसारखाच आहे, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs), हा हाय अलर्ट डीआरआय, एफआययू, सीबीआय, एनआयए, सेबी सारख्या प्रमुख वित्तीय आणि नियामक संस्थांसोबत शेअर केला आहे.
सामान्य माणसाला या खऱ्या आणि बनावट नोटांमध्ये फरक करणे खूप कठीण आहे. या नोटा ओळखण्यासाठी केंद्र सरकारने काही पॉइंट्स दिले आहेत, ज्याच्या मदतीने 500 रुपयांच्या खऱ्या नोटा ओळखणे शक्य होईल. बनावट नोटांवर ‘RESERVE BANK OF INDIA’ या मजकुरात एक छोटीशी चूक आहे, जिथे ‘RESERVE’ मधील ‘E’ च्या जागी ‘A’ वापरले गेले आहे, म्हणजेच ‘RASARVE BANK OF INDIA’ असे लिहिले आहे. ही चूक इतकी सूक्ष्म आहे की, नीट लक्ष न दिल्यास ती सहज चुकू शकते.
गृह मंत्रालयाने बँका, वित्तीय संस्था आणि सर्वसामान्यांना सावध राहण्याचे आणि संशयास्पद नोटा त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. गुप्तचर माहितीनुसार, या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत आणि काही प्रकरणांमध्ये दहशतवादी निधीपुरवठ्याशी त्यांचा संबंध असू शकतो. या नोटा तयार करणारी टोळी अत्यंत तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे, ज्यामुळे पोलीस आणि वित्तीय संस्थांसमोर मोठे आव्हान आहे. बाजारात किती बनावट नोटा फिरत आहेत हे कोणत्याही एजन्सीला कळणे शक्य नाही. यामुळेच गृह मंत्रालयाला याबद्दल खूप चिंता आहे आणि त्यांनी लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. (हेही वाचा: Online Booking Scams: चार धाम यात्रेच्या नावाखाली होत आहे ऑनलाईन फसवणूक; भाविकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा, सरकारने जारी केला अलर्ट))
भारतीय रिझर्व्ह बँकेने 500 रुपयांच्या खऱ्या नोटा ओळखण्यासाठी काही सुरक्षा वैशिष्ट्ये नमूद केली आहेत-
- सर्वात महत्वाचे म्हणजे नोटेवर असलेले ‘RESERVE BANK OF INDIA’चे स्पेलिंग.
- खऱ्या नोटेवर महात्मा गांधींचे चित्र मध्यभागी ठळकपणे दिसते. बनावट नोटांवर हे चित्र अस्पष्ट किंवा वेगळ्या ठिकाणी असू शकते.
- नोटेच्या तळाशी उजव्या बाजूला असलेले 500 रुपयांचे प्रतीक नोटेला झुकवले असता हिरव्या ते निळ्या रंगात बदलते. बनावट नोटांवर हे वैशिष्ट्य गहाळ किंवा कमी स्पष्ट असू शकते.
- नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभाचे चिन्ह आहे, जे खऱ्या नोटेवर स्पष्ट आणि अचूक आहे.
- नोटेवर सूक्ष्म अक्षरांमध्ये ‘RBI’ आणि ‘500’ लिहिलेले आहे, जे मॅग्निफायिंग ग्लासने दिसते. बनावट नोटांवर ही अक्षरे अस्पष्ट किंवा गहाळ असू शकतात.
- खऱ्या नोटेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आणि घोषवाक्य आहे, जे बनावट नोटांवर कदाचित नसू शकते.
दरम्यान, बनावट नोटांचा प्रसार छोट्या व्यापाऱ्यांना आणि बँकांना आर्थिक नुकसान पोहोचवू शकतो, कारण या नोटांचे मूल्य शून्य आहे. बनावट नोटांमुळे लोकांचा रोखीच्या व्यवहारांवरचा विश्वास कमी होऊ शकतो, ज्यामुळे डिजिटल पेमेंट्सकडे आणखी झुकाव वाढेल. याबाबत बँका आणि प्रवर्तन यंत्रणा सतर्क असून, सर्वसामान्यांनीही प्रत्येक 500 रुपयांची नोट काळजीपूर्वक तपासावी. आरबीआयच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर करून आणि संशयास्पद नोटा त्वरित कळवून या समस्येवर मात करता येईल. ही केवळ आर्थिक समस्या नाही, तर देशाच्या सुरक्षेशी निगडित आव्हान आहे.