PM Narendra Modi Lok Sabha Speech: कृषी कायदा ते शेतकरी आंदोलन, लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 10 प्रमुख मुद्दे
Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकसभा (Lok Sabha) सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना कृषी कायदा (Farm Laws), शेतकरी आंदोलन (Farmers' Protest) आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी त्यांनी काँग्रेस (Congres) पक्षासह विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. कृषी कायद्यावर सभागृहात चर्चा झाली. परंतू, ही चर्चा केवळ कायद्याच्या रंगावर झाली. कंटेंटवर झाली नाही, असे पंतप्रधान म्हणाले. या वेळी त्यांनी काँग्रेस हा एक गोंधळलेला पक्ष असल्याचेही म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत (PM Narendra Modi Lok Sabha Speech) केलेल्या भाषणातील हे प्रमुख 10 मुद्दे.

  1. केंद्र सरकारने मंजूर केलेले तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्यात बदल केला जाईल. हा देश देशातील नागरिकांचा आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतो. जर तशी वेळ अली तर कायद्यात योग्य ते बदल केले जातील.
  2. कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना पर्याय देण्यात आला आहे. शेतकऱ्याला ज्या ठिकाणी योग्य वाटेल त्या ठिकाणी त्याने आपला शेतकमाल विक्री करावा. कृषी कायदा लागू झाल्यानंतर देशातील ना एमएसपी बंद झाली. ना मंडी बंद झाली. सर्व काही सुरु आहे. शेतकरी आंदोलकांसोबत कृषी मंत्री सातत्याने चर्चा करत आहेत. कायद्यात जो बदल आवश्यक आहे. तो बदल निश्चित केला जाईल.
  3. कोरोना काळातही सरकारने तीन कृषी कायदे आणले. कारण हे कायदे आणणे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. आज कृषी क्षेत्रामध्ये जी अवस्था आहे त्यातून बाहेर येण्यासाठी आमच्यासमोर प्रचंड अडचणी आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. म्हणूनच हे कायदे आणले आहेत. (हेही वाचा, PM Narendra Modi On Farm Laws: कृषी क्षेत्रात सुधारणांना शरद पवार यांच्या सह कॉंग्रेसचा एकेकाळी पाठिंबा मग आता यु टर्न का? विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत नव्या कृषी कायद्यांवर सोडलं मौन!)
  4. कृषी कायद्याच्या रंगाबद्दल काँग्रेस खूप विचार करत आहे. परंतू, काँग्रेसने या कायद्याच्या कंटेंट आणि इंटेंटवर चर्चा करायला हवी.
  5. कोरोना काळात आम्ही रिफॉर्मचा सिलसिला जारी ठेवा. आम्ही काही महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्याचा परिणाम असा झाला की आज ट्रॅक्टर असो वा कार सर्वांची विक्रमी विक्री होत आहे. जीएसटीचेही विक्रमी कलेक्शन झाले आहे.
  6. जगातील अनेक देश असे आहेत त्यांच्या कोषागारात हजारो डॉलर आणि पाऊंड असतानाही ते जनतेपर्यंत पोहोचवू शकले नाहीत. परंतू, भारताने या कोरोना काळातही सुमारे 75 कोटींपेक्षाही अधिक भारतीयांपर्यंत सलग 8 महिने अन्नधान्य पोहोचवले.
  7. एका मोठ्या बदलासाठी देशातील शेतकऱ्यांनी दीर्घकालीन प्रवासासाठी तयार रहावे लागेल. आम्ही छोट्या शेतकऱ्यांना बियाण्यांपासून बाजारापर्यंत सोयीसुविधा देणार आहोत. सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो आहोत. असे करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्याला सशक्त बनविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
  8. आपल्याकडे कृषी हा समाजाचा एक भाग आहे. आमचे सर्व सण, उत्सव ही बियाणे पेरणे आणि पीक उगवणे याच्याशीच संबंधीत आहेत.
  9. इथला राजा जनक आणि कृषीबंदू बलराम यांनीही नांगर चालवला होता. कृषी क्षेत्रात प्रचंड मोठ्या बदलाची गरज आहे.
  10. शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी क्षेत्रात गुंतवणुकीची आवश्यकता आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.