PM NARENDRA MODI| PHOTO CREDITS: File Photo

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (8 फेब्रुवारी) राज्यसभेमध्ये बोलताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind)  यांच्या अभिभाषणावर धन्यवाद व्यक्त केले आहे. या भाषणात कोविड 19 संकटकाळातील भारताच्या कामगिरीसह नव्या कृषी कायद्यांबाबत आणि शेतकरी आंदोलनावर बोलत या विषयीचे आपलं मौन सोडलं आहे. बॉर्डरवर सुरू असलेले आंदोलन शेतकर्‍यांनी मागे घ्यावं आणि चर्चेने या विषयावर मार्ग काढावा असे आवाहन देखील त्यांनी आज संसदेमधून केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांचा देखील समाचार घेतला आहे. 'आंदोलन जीवीं'पासून देशाला वाचवा असं त्यांनी म्हटलं आहे. तर सार्‍याच सरकारना कृषी क्षेत्रात सुधारणा हव्या असताना आता यु टर्न का घेत आहेत असा सवाल त्यांनी शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस आणि विरोधकांना केला आहे.

आज राज्यसभेत नरेंद्र मोदी बोलत असताना देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचाही कृषी क्षेत्रातील सुधारणांना पाठिंबा आहे. त्यांच्यासोबतच कॉंग्रेस आणि अन्य विरोधक पक्षांनी एकेकाळी सुधारणा व्हाव्यात अशी भूमिका घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अंमलबजावणी होऊ शकली नसेल पण आता होत आहे मग त्याला विरोध का? असा सवाल नरेंद्र मोदींनी विचाराला आहे. दरम्यान मार्ग वेगळे असतील तर चर्चेने विषय संपवता येऊ शकतो पण त्यासाठी वयोवृद्धांनी थंडीत बाहेर बसणं योग्य नसल्याचं त्यांनी नमूद केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी एमएसपी होती आहे आणि राहणार असं म्हटलं आहे. देशात कृषी क्षेत्रात काही बदल करणं आवश्यक आहेत. ते एकदा स्वीकारून बघा. काही चूकलं तर ते माझ्या माथी आणि श्रेय तुमच्याकडे ठेवा असं म्हणत त्यांनी कृषी कायद्याला विरोध करू नका असं म्हटलं आहे.

आजच्या भाषणात त्यांनी देशात आता 'आंदोलन जीवी' जमात पुढे येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांना कोणताही विषय असेल तर केवळ आंदोलन करायचं आणि त्यावर वाढायचं इतकंच ठाऊक असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्रीय कृषीमंत्री तोमर सिंह यांनी मांडलेल्या प्रश्नावर विरोधक मूग गिळून गप्प असल्याचं म्हटलं आहे. त्यांना कुणीच उत्तर देत नाही. सोबतच त्यांनी संसदेमध्ये आज माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे शब्द बोलून दाखवत आता विरोध मागे घेण्याचं आवाहन केले आहे.