भारतात कोरोना लसीकरणाच्या दिरंगाईमुळे भारतीयांचा परदेशप्रवास होणार खडतर, काय येऊ शकतात अडचणी, वाचा सविस्तर
Representational Image (Photo Credits: Pexels.com )

भारतात कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे (COVID-19 Vaccination Shortage in india) नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आणखी एक नवी अडचण उभी राहिली आहे ती म्हणजे भारतीयांची आता परदेशवारी (International Tour) देखील खडतर होणार आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध 31 मेनंतरही उठणार नाही अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. ज्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षणावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन लशींच्या यादीत समावेश नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेश दौरा करणे तुलनेने अवघड असेल, असेही म्हटले जात आहे.हेदेखील वाचा- Canada Ban Passenger Flights From India: कॅनडाने भारत आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रवाशांच्या उड्डाणांवर 21 जूनपर्यंत घातली बंदी

लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवास या मुद्यांसंदर्भात केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण केले. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करू देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली जात आहे. करोना संसर्ग नसल्याचा अहवाल असेल तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची मुभा दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहमतीनंतर भारतही लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेईल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.

लसीकरण झालेल्या प्रवाशांना युरोपीय देशांमध्ये प्रवेश देण्याबाबत युरोपीय महासंघामध्ये सकारात्मक चर्चा केली जात असली तरी, जागतिक आरोग्य संघटनेत मात्र त्यावर सहमती झालेली नाही. त्यामुळे लसीकरणानंतर परदेशात जाण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.