![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/05/flight--380x214.jpg)
Canada Ban Passenger Flights From India: कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कॅनडाने भारत आणि पाकिस्तानहून सर्व प्रवाशी उड्डाणांवर बंदी आणखी 30 दिवसांपर्यंत वाढविली आहे. आता ही बंदी 21 जूनपर्यंत लागू होईल. यापूर्वी ही बंदी 21 मेपर्यंत लागू करण्यात आली होती. तथापि, लस, पीपीई किट आणि इतर आवश्यक वस्तूंची निरंतर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मालवाहू उड्डाणांवर ही बंदी लागू होणार नाही. कॅनडाचे परिवहन मंत्री उमर अल्गब्रा यांनी यासंदर्भात घोषणा केली. परिवहन मंत्री उमर अल्गब्रा म्हणाले, "कॅनडाने भारत आणि पाकिस्तानकडून प्रवाशांच्या विमान वाहतुकीवरील बंदी 30 दिवसांपर्यंत वाढवून 21 जून पर्यंत वाढवली आहे. यंदा 22 एप्रिल रोजी पहिल्यांदा बंदी जाहीर झाल्यानंतर एअरलाइन्सच्या प्रवाशांमध्ये मोठी घट दिसून आली.
कॅनडा-अमेरिका सीमेवरील बंदी 21 जूनपर्यंत वाढविण्यात आली
त्याचबरोबर कॅनडानेही अमेरिकेच्या सीमेवर अनावश्यक प्रवासावरील बंदी 21 जूनपर्यंत वाढविली आहे. पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी गुरुवारी ट्विट केले की, आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोविडचा प्रसार मर्यादित करण्यासाठी आम्ही सध्या आणखी 30 दिवस उपाययोजना करीत आहोत. 21 जून पर्यंत अमेरिका आणि कॅनडा या दोन देशांमधील अनावश्यक प्रवासावर बंदी आहे. (वाचा - परराष्ट्रमंत्री Jaishankar पुढील आठवड्यात Mission Vaccine साठी अमेरिकेत जाणार; कोविड-19 लस खरेदी आणि संयुक्त उत्पादनावर करणार चर्चा)
कॅनडाप्रमाणेचं इतरही अनेक देशांनी कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी विमानांवर बंदी घातली आहे. संयुक्त अरब अमिरातीने भारतातून येणारे सर्व उड्डाणे निलंबित केली आहेत. ब्रिटनमध्येही भारतातील प्रवाशांना प्रवेश बंद आहे. कॅनडा सध्या संसर्गाच्या तिसर्या लाटेचा सामना करत आहे. कॅनडामध्ये आतापर्यंत 13 लाख 50 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 25,111 मृत्यू झाले आहेत.