Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेकची Covaxin डेल्टा वेरिएंटवर 65.2% परिणामकारक
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

हैद्राबाद स्थित भारत बायोटेकने (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) या कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सचा ( phase-3 clinical trial) डेटा सादर केला आहे. 130 कोरोनाबाधित रुग्णांवर या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर ही लस कोविड-19 चा संसर्ग झालेल्या लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर 77.8% परिणामकारक असल्याचे यातून समोर आले आहे. त्याचबरोबर तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर ही लस 93.4 टक्के प्रभावी ठरली असून कोविड-19 च्या डेल्टा वेरिएंटवर ही लस 65.2 टक्के परिणामकारक आहे, अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे. (कोविड-19 लसी Delta Plus वेरिएंटवर परिणामकारक? ICMR च्या अभ्यासातून लवकरच होणार खुलासा)

तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्समध्ये 16,973 सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी 130 रुग्णांना symptomatic कोविड झाल्याचे आढळून आले. यापैकी 24 रुग्ण लसीच्या ग्रुपमधले असून 106 रुग्णांना प्लेसिबो देण्यात आला होता. यामुळे लसीची एकूण कार्यक्षमता 77.8% ठरवण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ट्रायल्समध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा मोठा दुष्परिणाम झाला नाही, असेही कंपनीने नमूद केले आहे.

ANI Tweet:

इतर लसींपेक्षा कोवॅक्सिन लसीची किंमत खाजगी रुग्णालयांमध्ये अधिक आहे. या लसीच्या वितरणासाठी अधिक खर्च येत असल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये 1200 रुपये प्रति डोस या किंमतीने ही लस दिली जात आहे. कोवॅक्सिन ही जगातील तिसरी महाग लस आहे.

दरम्यान, या महिन्यात तब्बल 12 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी 37 राज्या आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु केले आहे. भारत बायोटेकने दर महिन्याला 1-2 कोटी कोविड-19 डोसेस उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.