Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

काल नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीयांना एक आनंदाची बातमी मिळाली होती. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute of India) लस ‘कोव्हिशिल्ड’ला (Covishield) भारतामध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर भारत बायोटेकच्या स्वदेशी लसीचा काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आता माहिती मिळत आहे की, तज्ञ पॅनेलने भारत बायोटेकची (Bharat Biotech) स्वदेशी विकसित कोरोना व्हायरस लस (COVID-19 Vaccine) कोव्हॅक्सिनच्या (Covaxin) प्रतिबंधित आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची शिफारस केली आहे.

अशाप्रकारे कोरोना साथीच्या विरूद्धच्या लढ्यात देशाला दुसरी मोठी भेट मिळाली. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या कोरोना विषयावरील विषय तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली आहे. हैद्राबादस्थित भारत बायोटेकला आज दुपारी दीड वाजता कोरोना विषाणूच्या लसींचे मूल्यांकन करणाऱ्या तज्ञांच्या समितीने बैठकीला बोलावले होते. (हेही वाचा: भारतीयांसाठी खुशखबर! सीरम संस्थेची लस 'कोव्हिशिल्ड'च्या आपत्कालीन वापरास मिळाली परवानगी- Reports)

शुक्रवारी 'सीडीएससीओ'च्या कोरोना सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता दिली. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे पाठविले गेले आहे. DCGI ने परवानगी दिल्यावर ही लस देशात वापरास उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त भारत बायोटेक आणि फायझर यांनी देशातील कोरोना लसीच्या तातडीच्या वापरासाठी अर्ज केला आहे. आता आज भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिनच्या वापराचीही शिफारस करण्यात आली.

दरम्यान, भारतात, सरकारच्या वतीने लस देण्याची तयारी जोरात सुरू आहे. वर्षाच्या सुरूवातीस, मुख्यतः 300 दशलक्ष लोकांना लस देण्याचे लक्ष्य आहे, ज्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आजारी असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी सांगितले आहे की, आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धांना कोरोना लस मोफत मिळणार आहे.