संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीविरुद्ध लढण्यासाठी लस (Vaccine) हाच शेवटचा पर्याय उपलब्ध होता. सध्या जगात अनेक कंपन्या अशा लस बनवत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतीयांना मोठी खुशखबर मिळाली आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute of India) लस ‘कोव्हिशिल्ड’ला (Covishield) भारतामध्ये आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने बनविलेल्या विशेष पॅनेलने हा निर्णय घेतला आहे. आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ची कोविड-19 वरील तज्ज्ञ समिती, ऑक्सफोर्डच्या कोव्हिशिल्ड अँटी-कोरोना विषाणूच्या लसीच्या वापरास मान्यता देण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे शिफारस करणार आहे.
ब्रिटनमध्ये या लसीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाल्यानंतर भारतातही परवानगी दिली जाईल असे मानले जात होते. ऑक्सफोर्डच्या लसीमध्ये सीरम संस्था भागीदार आहे आणि ही लस कोव्हिशिल्ड या नावाने देशात विकली जाणार आहे. अशाप्रकारे भारतामध्ये परवानगी मिळालेली ही पहिली लस आहे. यासह ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे ज्याने ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेना लसीच्या वापरास परवानगी दिली. भारतातील सीरम संस्थेने या लसीचे 5 कोटी डोस यापूर्वीच तयार केले आहेत.
आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ समितीने सध्या कोव्हिशिल्ड वापरण्यास मान्यता देण्याची शिफारस केली आहे, परंतु याबाबत अंतिम निर्णय ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचा असणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यावर ही लस भारतामध्ये वापरास उपलब्ध होईल. कोव्हिशिल्ड लस भारतासाठी अधिक अनुकूल असण्याची अनेक कारणे आहेत. फायजरची लस -70 डिग्री सेल्सिअस तपमानावर गोठविणे म्हणजे फ्रीझरची व्यवस्था करणे भारतासाठी एक मोठे आव्हान असेल. त्याच वेळी, मॉडर्नाच्या लसीसाठीदेखील डीप फ्रीजर आवश्यक असेल. परंतु ऑक्सफोर्ड लस सामान्य तापमानात ठेवली जाऊ शकते.
दरम्यान, भारतात, सरकारच्या वतीने लस देण्याची तयारी जोरात सुरू आहे. वर्षाच्या सुरूवातीस, मुख्यतः 300 दशलक्ष लोकांना लस देण्याचे लक्ष्य आहे, ज्यात आरोग्य कर्मचारी, पोलिस, कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आणि आजारी असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाईल.