Covid-19 Vaccine Booster Shots: 'बुस्टर डोस'च्या नावाखाली फसवणूक; OTP संदर्भात फोन आला तर सावधान!
Covid-19 Vaccine | (Photo Credits: PTI)

बनावट कोरोना लस (Coronavirus Vaccine) दिल्याची अनेक प्रकरणे पुढे आल्यानंतर आता 'बुस्टर डोस' (Booster Dose) संदर्भातही नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. कोरोना व्हायरस महामारी आणखी नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली असून, नागरिकांना 'बुस्टर डोस' (Covid-19 Vaccine Booster Shots) घेण्याचे अवाहन केले आहे. 10 जानेवारीपासून देशात फ्रंटलाईन वर्कर्सना बुस्टर डोस देण्यास सुरुवातही झाली आहे. एका बाजूला 'बुस्टर डोस' उपक्रम वेगात असताना दुसऱ्या बाजूला काही सायबर गुन्हेगार फसवणुकीचे रॅकेटही चालवत आहेत. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर याबाबत अनेक मेसेजही व्हायरल झाले आहेत. ज्यात दावा करण्यात आला आहे की, सायबर गुन्हेगार हे बूस्टर डोसच्या नावाखाली अनेकांना चूना लावू शकतात.

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना फोन करतात आणि बूस्टर डोसबाबत माहिती देण्याच्या बहाण्याने खासगी माहिती गोळा करतात. ते सांगतात की आपल्यालाही जर बुस्टर डोस घ्यायचा असेल तर आम्ही आपली मदत करु इच्छितो. त्यासाठी आपण आपली वेळ आताच बुक करा आणि आपले डिटेल्सही द्या. आपण आपले डिटेल्स देता तेव्हा आपल्याला एक ओटीपी मिळतो. जर आपण हा ओटीपी नंबर शेअर केला तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ओटीपीच्या आधारे हे ठग आपल्या बँक खात्यातील रक्कम आपल्या परस्पर त्यांना हव्या त्या खात्यात वळती करु शकतात. (हेही वाचा, COVID-19 रुग्णावाढ नियंत्रणासाठी Omicron Vaccine मार्च महिन्यात दाखल होईल, फायजर प्रमुखांचा अंदाज)

वास्तव असे की संपूर्ण देशात केवळ ‘CoWin’ पोर्टल द्वाराच कोविड लसीकरणाची नोंद केली जाऊ शकते. तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यातील तालुका अथवा गाव पातळीवरुन जरी लसीकरण नोंदणी केली तरीही तुम्हाला कोविन अॅपवरुनच नोंद करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे कोविन अॅपवर कधीही आपली खासगी माहिती मागवील जात नाही. त्यामुळे तुम्हाला जर कोणाचा फोन आला आणि बुस्टर डोसबाबत माहिती सांगून तुमची वैयक्तीत माहिती मागितली तर वेळीच सावधान. कोणालाही माहिती देऊ नका. तसेच, आपला ओटीपी क्रमांकही शेअर करु नका.

दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक झाल्याची कोणतीही तक्रार अद्यापपर्यंत तरी पुढे आली नाही. मात्र सोशल मीडियावर अनेक लोक हा मेसेज एकमेकांना पाठवत असल्याचे आढळून आले आहे.