Covid-19 Vaccine Availability: कोविड-19 वरील कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार? SII चे CEO अदार पूनावाला यांनी दिले 'हे' उत्तर
Corona Vaccine | Photo Credits: SII Facebook & Pixabay.com

गेल्या 6-7 महिन्यांपासून देशावर घोंघावत असणारे कोविड-19 (Covid-19) चे संकट नियंत्रणात आणण्यात भारत सरकारसह आरोग्य यंत्रणांना यश येत आहे. दिवसागणित वाढणारी कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट सुधारला आहे. मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र अद्याप संकट पूर्णपणे टळलेले नाही. कोविड-19 वर ठोस लस उपलब्ध होईपर्यंत या संकटापासून सुटका होणार नाही. त्यामुळे लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) चे सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लसीसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. एनडीटीव्ही शी बोलताना सांगितले की, "2021 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाईत लस उपलब्ध होऊ शकते."

अदार पूनावाला म्हणाले की, "एसआयआय निर्मित ऑक्सफोर्ड कोविड-19 लसीचे 100 दशलक्ष डोसची पहिली तुकडी 2021 च्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत येऊ शकते. ही लस अत्यंत माफक दरात नागरिकांसाठी उपलब्ध असेल. तसंच कोरोना लसीची चाचणी डिसेंबरमध्ये संपेल आणि जानेवारीपर्यंत देशात लस उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले."

सीरम  इंस्टीट्युट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी आहे. या कंपनीद्वारे Oxford-AstraZeneca निर्मिती लसीच्या चाचण्या भारतात सुरु आहे. भारतात ही लस कोविशिल्ड या नावाने ओळखली जाते. दरम्यान, लस भारतातील प्रत्येक नागरिकाला पुरवण्यासाठी 80,000 कोटी इतका खर्च येईल. याबाबत भारत सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ट्विट पूनावाला यांनी मागील महिन्यात केले होते. त्याबद्दल अदार पुनावाला यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, "या बाबत आरोग्य मंत्रालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सकारात्मक माहिती देण्यात आली आहे. तसंच कोविड वरील लस पुरवण्यासाठी पुरेसे फंड असल्याचे आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आले आहे." (कोविड 19 लसींबाबत गूडन्यूज! Johnson & Johnson ची लस जानेवारी 2021 पर्यंत येण्याची शक्यता तर Oxford-AstraZeneca vaccine वयोवृद्धांमध्येही सकारात्मक परिणाम देत असल्याची माहिती)

जगभरात कोविड-19 वरील विविध लसी विकासाच्या टप्प्यात आहेत. काही लसींचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. दरम्यान, भारतात पहिल्या टप्प्यात तब्बल 3 कोटी नागरिकांना देण्यात येणार लसीचा डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यात आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य असणार असून हा टप्पा जानेवारी ते जून 2021 पर्यंत असेल, असेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर लसीच्या वितरणासाठी आणि जलद पुरवठ्यासाठी विशेष योजना भारत सरकारकडून तयार करण्यात आली आहे.