देशाचे लक्ष महत्वपूर्ण निकालांकडे; 'राफेल डील', 'शबरीमाला मंदिरात महिला प्रवेश' आणि 'राहुल गांधी' संदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
राफेल, राहुल गांधी, शबरीमाला मंदिर (संग्रहित संपादित प्रतिमा)

राफेल लढाऊ विमान व्यवहार (Rafale Deal) कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात, शबरीमाला मंदिरात (Sabarimala Temple) महिलांच्या प्रवेशाविरोधात दाखल केलेल्या आढावा याचिकेवर, तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिके संदर्भातील महत्वपूर्ण निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 14 डिसेंबर 2018 रोजी राफेल लढाऊ विमान व्यवहार कायम ठेवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर त्याविरोधात पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली. त्याचबरोबर शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या आदेशावर पुनर्विचार करण्याच्या याचीकेवरही गुरुवारीच, म्हणजेच उद्या सुनावणी पार पडणार आहे.

राफेल प्रकरण -

गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी, फ्रेंच कंपनी 'डसॉल्ट'चा पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी माजी केंद्रीय मंत्री - यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी आणि कार्यकर्ते-वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. याआधी कोर्टाने डसॉल्टकडून 36 लढाऊ विमान खरेदी करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला क्लीन चिट दिली होती. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. के. के. कौल आणि न्यायमूर्ती के.के. एम. जोसेफ यांचे खंडपीठ या प्रकरणात राजकीयदृष्ट्या संवेदनशीलतेने निर्णय देईल.

शबरीमाला प्रकरण -

शबरीमाला मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालय 56 याचिकांवर आपला निर्णय देईल. त्यात खटल्याच्या हस्तांतरणासाठी पाच याचिका, चार नवीन रिट याचिकांसह 65 नवीन याचिकांवर सुप्रीम कोर्टाकडून आपला निकाल दिला जाईल. शबरीमालावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळमध्ये हिंसक निदर्शने झाली. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने, 28 सप्टेंबर 2018 रोजी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या याचिकांवर सुनावणी घेत 6 फेब्रुवारी रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. (हेही वाचा: राफेल घोटाळा टेप: राहुल गांधी आक्रमक; लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब)

28 सप्टेंबर 2018 रोजी एका निकालात, केरळच्या प्रसिद्ध अयप्पा मंदिरात 10 ते 50 वर्षे वयोगटातील महिला आणि मुलींच्या प्रवेशावरील बंदी उठविण्यात आली होती. निर्णय देताना सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, हिंदू धर्माची ही शतकांची परंपरा बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने खुल्या न्यायालयात या याचिकांवर सुनावणी केली होती आणि पक्षांच्या सुनावणीनंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. आता उद्या या संदर्भात निर्णय होईल.

दरम्यान, केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला येथे दोन महिन्यांची तीर्थयात्रा 17 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयप्पा मंदिराजवळ दहा हजाराहून अधिक पोलिस तैनात असतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मक्कारविल्लाक्कू उत्सवात मंदिराच्या आवारात पाच टप्प्यात 10, 017 पोलिस तैनात केले जातील. (हेही वाचा: नारीशक्तीचा विजय! शबरीमाला मंदिराचे दरवाचे महिलांसाठी खुले; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय)

राहुल गांधी प्रकरण -

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरूद्ध दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय गुरुवारी निर्णय देईल. ही याचिका भाजप नेते मीनाक्षी लेखी यांनी दाखल केली असून, राहुल गांधींनी असे म्हटले आहे की, चौकीदार चोर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. मीनाक्षी लेखी यांनी असा आरोप केला होता की, राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधानांना राजकारणाशी जोडले आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांनी माफीनामा देखील दाखल केला होता, परंतु कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.