Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बहुतांश देशांनी पर्यटकांना येण्यास सुद्धा बंदी घातली आहे. तसेच विमानांचे उड्डाण सुद्धा रद्द करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी येणे अधिकच मुश्किल झाले आहे. भारतातील काही विद्यार्थी आणि पर्यटक इटली येथे अडकले आहेत. रोम येथील विमानतळावर भारतीय विद्यार्थी अडकले असून ते मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, एअर इंडिया यांनी असे स्पष्ट केले आहे की, जो पर्यंत एखादा प्रवासी नो-कोरोना व्हायरस (No-Coronavirus Certificate) सर्टिफिकेट दाखवत नाही तो पर्यंत त्यांना विमानात प्रवेश नाकारला जाणार आहे.

तर विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, इटली येथील डॉक्टर स्थानिकांना उपचार देण्यात व्यस्त आहेत. याच कारणास्तव इटली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी हैरदबादचे कार्यकर्ता अमजेद उल्लाख खान यांच्यासोबत संपर्क केला असून त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला आहे. या प्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमोर खान यांनी हा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे आता इटली येथील भारतीय दूतवास अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधू शकतात.(कोरोना व्हायरसमुळे एअर इंडियाची रोम, मिलान आणि सिओल येथील उड्डाणे रद्द)

 जगभरात कोरोना व्हायरसमुळे चीन नंतर इटली येथे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे. येथे आतापर्यंत 827 जणांचा मृत्यू झाला आहे. इटली येथे सातत्याने कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत असल्याने एअर इंडिया यांनी इटली येथे जाणारी सर्व उड्डाणे 28 मार्च पर्यंत रद्द केली आहेत. तर भारतातीय विमानतळावर आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा वाढते जाळे पाहता भारताने मंगळवारी फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन येथील नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या ई-व्हिजाला स्थगिती देण्यात आली आहे. याच दरम्यान, ओसीआय कार्ड होल्डर यांना देण्यात आलेली व्हिजा फ्री ट्रॅव्हल सुविधा सुद्धा 15 एप्रिल प्रर्यंत बंद करण्यात आली आहे.