
भारत गेले 1 वर्षे कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. याकाळात लाखो लोक संक्रमित झाले तर हजारो लोकांचा मृत्यू झाला. आता कुठे संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याने केंद्र तसेच राज्य सरकारांनी निःश्वास सोडला आहे. आता माहिती मिळत आहे की, कोविड-19 साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 162 डॉक्टर, 107 परिचारिका आणि 44 आशा वर्कर्सनी आपला जीव गमावला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी मंगळवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, 22 जानेवारीपर्यंत राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी तयार केली गेली आहे.
कोविड-19 मुळे जीव गमावलेल्या आरोग्य कर्मचार्यांविषयी इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेली आकडेवारी मंत्रालयाने घेतली आहे का? आणि त्यांची पडताळणी करण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले आहेत का? अशी विचारणा चौबे यांना करण्यात आली. यावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी: विमा योजना) अंतर्गत विमा सवलतीच्या रकमेच्या वितरणाची प्रक्रिया विकेंद्रीत करण्यात आली आहे. त्यानुसार कोविड-19 मुळे प्रभावित आणि जीव गमावलेल्या व्यक्तीच्या पडताळणीची जबाबदारी राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. (हेही वाचा: Republic Day Tractor Rally: किसान ट्रॅक्टर रॅलीनंतर 100 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याचा दावा; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी जारी केला हेल्पलाईन क्रमांक)
दाव्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र हे पीडित ज्या ठिकाणी काम करत होता अशा आरोग्य संस्था किंवा कार्यालयाकडून दिले जाते. त्यानंतर संबंधित अधिकारी ते अग्रेषित करतात आणि विमा कंपनीकडे दावा सादर करतात. दरम्यान, भारतामध्ये आतापर्यंत एकूण 1,07,66,245 रुग्ण आढळले असून, आतापर्यंत 1,04,48,406 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण 1,54,486 मृत्यू झाले असून, सध्या 1,63,353 सक्रीय रुग्ण आहेत.