प्रजासत्ताक दिनी किसान ट्रॅक्टर परेड (Tractor Rally) दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर शंभराहून अधिक लोक बेपत्ता असल्याचा दावा शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने (Samyukta Kisan Morcha) केला आहे. याबाबतच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एका निवेदनात म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चा बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती गोळा करेल आणि औपचारिक कारवाईसाठी ही बाब अधिकाऱ्यांसमोर नेली जाईल. अशा सर्व प्रकरणांच्या अहवालासाठी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी सोमवारी हेल्पलाईन क्रमांक 112 जाहीर केला. त्याच बरोबर, राष्ट्रीय राजधानीत या प्रकरणात सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी अॅडव्होकेट जनरल यांनी 70 वकीलांची नेमणूक केली आहे.
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी या विषयावर केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि ते अशा बेपत्ता व्यक्ती किंवा शेतकर्यांच्या प्रकरणांची वैयक्तिकपणे दखल घेऊन मंत्रालयासमोर ही गोष्ट मांडतील. मुख्यमंत्री म्हणाले, 'दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कांसाठी लढणार्या शेतकर्यांसोबत आम्ही आहोत. ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी बेपत्ता झालेल्या लोकांच्या रिपोर्टसाठी 112 शी संपर्क साधा. बेपत्ता झालेल्या सर्वांचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ते आपल्या घरी परत येतील हे आम्ही सुनिश्चित करू.'
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गठीत झालेली समिती प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर, बेपत्ता झालेल्या लोकांची, दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आणि त्यांच्यावरील खटल्यांविषयी माहिती गोळा करेल. मोर्चाने 16३ लोकांची ओळख पटवली आहे, जे तुरूंगात आहेत किंवा पोलिस कोठडीत आहेत. (हेही वाचा: शेतकरी आंदोलनाबाबत खोटी आणि चिथावणीखोर माहिती पोस्ट करणाऱ्या 250 ट्विटर खात्यांवर बंदी; भारत सरकारने पाठवली होती कायदेशीर नोटीस)
तीन नवीन कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी 26 जानेवारी रोजी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, हजारो निदर्शकांची पोलिसांशी झटापट झाली होती. क्षणार्धात ही झटापट हिंसाचारात बदलली होती. त्यावेळी अनेक वाहनांचे नुकसान झाले व अनेक पोलीसही जखमी झाले होते. यादरम्यान ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर धार्मिक ध्वज फडकवण्यात आला होता.