Farmers' Protest: शेतकरी आंदोलनाबाबत खोटी आणि चिथावणीखोर माहिती पोस्ट करणाऱ्या 250 ट्विटर खात्यांवर बंदी; भारत सरकारने पाठवली होती कायदेशीर नोटीस

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या हिंसाचारात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आणि पोलिसांसह शेकडो लोक जखमी झाले होते. तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी ही परेड काढली होती.

Farmers' Protest: शेतकरी आंदोलनाबाबत खोटी आणि चिथावणीखोर माहिती पोस्ट करणाऱ्या 250 ट्विटर खात्यांवर बंदी; भारत सरकारने पाठवली होती कायदेशीर नोटीस
Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने (Twitter) सोमवारी आपल्या व्यासपीठावर अनेक खात्यांवर बंदी घातली आहे. या खात्यांमध्ये नवीन शेती कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवरील शेतकर्‍यांच्या सध्याच्या निषेधाशी (Farmers' Protest) संबंधित अनेक खात्यांचा समावेश आहे. ट्विटरने भारतातील किसान एकता मोर्चा आणि कारवांशी संबंधित ट्विटर अकाउंट्स ब्लॉक केली आहेत. ही खाती बंद करण्यासाठी भारत सरकारने ट्विटरला कायदेशीर नोटीस पाठवली होती, त्यानंतर ट्विटरने ही खाती बंद केली आहेत. ट्विटरला शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि अशा माध्यम समूहांची खाती ब्लॉक करण्यास नोटीस देण्यात आली होती, जे शेती विधेयकाविरोधात होत असलेल्या निषेधाबाबत खोटी आणि चिथावणीखोर ट्विट करत होते.

ट्विटरने किसान एकता मोर्चा, द कारवां इंडिया, माणिक गोयल, ट्रॅक्टर 2 व्हाईट आणि जट_ जंक्शन, बंद केले आहे. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा एखाद्या खात्यावर बंदी असते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की योग्य कायदेशीर मागणीस प्रतिसाद म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संपूर्ण खात्यावर बंदी घालण्यास बांधील आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की ट्विटरला 250 हून अधिक अकाउंट्स किंवा ट्विट ब्लॉक करण्यास सांगितले गेले आहे, जे एका खास हॅशटॅगसह ट्विट करत होते. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, MEITY (IT Ministry) ने अशी 250 ट्विट किंवा ट्विटर खाती बंद केली आहेत जे #ModiPlanningFarmerGenocide हॅशटॅग वापरत होते. ही खाती 30 जानेवारी रोजी खोटी आणि चिथावणीखोर ट्विट करत होती. शेतकरी चळवळीमुळे होणारा हिंसाचार रोखण्यासाठी ही कारवाई केली असल्याचे सरकारने म्हटले आहे. (हेही वाचा: मोदी सरकारने भारताची मालमत्ता काही उद्योगपती मित्रांकडे सोपवायची योजना आखली आहे; केंद्रीय अर्थसंकल्पावर राहुल गांधी यांचा निशाणा)

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या हिंसाचारात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आणि पोलिसांसह शेकडो लोक जखमी झाले होते. तीन नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी ही परेड काढली होती.

दरम्यान, अनेक देशांमध्ये ट्विटस किंवा ट्विटर खात्यांना लागू असलेले कायदे आहेत. ट्विटर आपली सेवा सर्वत्र लोकांना उपलब्ध करुन देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. जर त्यांना अधिकृत अधिकाऱ्यांकडून विनंती प्राप्त झाली तर ते विशिष्ट देशात विशिष्ट कंटेंटवर बंदी घालतात. ‘काही कंटेंट थांबविणे आवश्यक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी पारदर्शकता खूप महत्वाची आहे,’ असे ट्विटरने म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2021 07:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).