Coronavirus: नियमांचे उल्लंघन, माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ( Lalu Prasad Yadav) यांचे चिरंजीव, त्या राज्याचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात लागू असलेला साथनियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन तेजप्रताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सर्कल ऑफिसर (सीओ) प्रकाश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तेज प्रताप यांच्या विरोधात रांची (Ranchi) पोलिसांनी शुक्रवारी (28 ऑगस्ट) गुन्हा दाखल केला.

प्रकाश कुमार यांनी चुटिया पोलीस स्टेशनला लिखित स्वरुपात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की 'गुरुवारी रात्री जिल्हा प्रशासनाचे पोलीस आणि अधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये रुम क्रमांक 507 ची पाहणी केली. या पाहणीत आढळून आले की, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव हे राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता तिथे राहात होते. तेजप्रताप यादव हे 14 दिवसांचा होम क्वारंटाईन प्रोटोकॉल न पाळताच बिहारला परतले.'

सीओ प्रकाश कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चुटिया पोलिसांनी तेज प्रताप यादव यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एका अधिकाऱ्याचीही निवड केली आहे. या आधी तेज प्रताप यांनी रांची येथील हॉटेलमध्ये एक खोली आरक्षीत केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल कॅपिटल रेजीडेंसीचे मालक आणि व्यवस्थापक ययांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, तेजप्रताप यादव हे आपले वडील लालू प्रसाद यादव यांच्या भेटीसाठी रात्री 2.30 वाजता पोहोचले होते. ते रांची येथील हॉटेल कॅपिटल रेजीडेंसी येथे राहिले. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्यात जवळपास अडीच तास चर्चा झाली. रांची पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला तेव्हा त्यांच्या राहण्याचा पूरावा मिळाला.