जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राजू शेट्टी (Photo Credit : Facebook)

बारामती (Bharamati) येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करताना जमावबंदी कायद्याचे उल्लंघन (Curfew Law) केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलनास परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील या सुचनांचे पालन स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले नाही. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख 11 आयोजक आणि इतर 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी ओंकार कैलास सिताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने सांगितल्यानुसार, गुरुवारी त्याला स्वाभिमानीच्या दूध दरवाढ आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून समजली होती. त्यानुसार, बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारी स्वाभिमानीचे अध्यक्ष शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते शारदाप्रांगणाजवळ एकत्र जमले. यावेळी शेख यांनी एमएच-42, एम-7471 या पिकअप वाहनातून 3 गायी दाटीवाटीने बसवून मोचार्साठी आणल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावले नव्हते. तसेच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नव्हते, असंही फिर्यादीने म्हटलं आहे. (हेही वाचा - BMC Withdraws Water Cut: मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट पूर्ण टळलं; तलावांमध्ये 95% च्या पार पाणीसाठा)

दरम्यान, राजू शेट्टी यांना मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, तरीदेखील मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चाच्या पुढील बाजूस दोन गायी दोरीने ओढत प्रांताधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे मोर्चा काढण्यात आला असल्याने आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.