![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/11/sanitary-pads-380x214.jpg)
शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड (Free Sanitary Napkins) देण्याची मागणी करून चर्चेत आलेल्या बिहारच्या मुलीला पॅन हेल्थकेअर (PAN Healthcare) कंपनीने मोठी भेट दिली आहे. मुलीने आवाज उठवलेल्या मुद्द्याला पाठिंबा देत कंपनीने मुलीला कंपनीच्या खर्चात वर्षभर मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे. हा खर्च तिच्या कुटुंबीयांच्या मदतीने करण्यात येणार आहे.
कंपनीने सांगितले की, सध्याचे युग वेगाने बदलत आहे, परंतु आजही महिलांची मासिक पाळी निषिद्ध मानली जात आहे. म्हणूनच आज गरज आहे की मुलींनी स्वतः पुढे येऊन हा विषय सार्वजनिक व्यासपीठावर आणला पाहिजे. या मुद्द्यावर व्यापक चर्चेची गरज आहे. युनिसेफने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुलीने हा मुद्दा उपस्थित केला होता.
शाळांना वर्षभर सॅनिटरी पॅडचा मोफत पुरवठा असायला हवा, असे ती म्हणाली होती. मात्र याला उत्तर देताना एका महिला आयएएस अधिकाऱ्याने सॅनिटरी पॅड मोफत दिल्यास दुसऱ्या दिवशी कंडोमची मागणी सुरू होईल, असे सांगितले होते. याचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत सॅनिटरी पॅड्स बनवणाऱ्या पॅन हेल्थकेअर या कंपनीने मुलीला पाठिंबा दिला आहे. कंपनीचे सीईओ चिराग पान यांनी सांगितले की, मुलीचे हे धाडसी पाऊल आहे व त्याचा आदर केला पाहिजे.
याबाबत रिया कुमारी या मुलीने सांगितले की, तिचा प्रश्न चुकीचा नाही. ती स्वत: सॅनिटरी पॅड खरेदी करू शकते, परंतु देशात अशा अनेक मुली आहेत ज्यांना ते परवडत नाही, विशेषतः झोपडपट्टी भागात राहणाऱ्या मुलींना. आपण हा मुद्दा स्वत:साठी उपस्थित केला नसल्याचे तिने सांगितले. ज्या मुलींना सॅनिटरी पॅड विकत घेता येत नाही, त्यांच्या आरोग्याचा विचार करून तिने हा मुद्दा स्टेजवर उपस्थित केल्याचे तिने सांगितले.
पॅन हेल्थकेअरचे सीईओ चिराग पान यांनी सांगितले की, कंपनीतर्फे शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मोफत दिले जातील. हा मुद्दा सर्वसमावेशकपणे मांडणाऱ्या रिया कुमारीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेट अँड ड्राय पर्सनल केअरचे सीईओ हरिओम त्यागी सांगतात, त्यांच्या 2022 एव्हरटीन मासिक पाळीच्या स्वच्छता सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, 23.5 टक्के स्त्रिया अजूनही अनियमित मासिक पाळी आल्यास डॉक्टर किंवा मित्र किंवा कुटुंबाचा सल्ला घेत नाहीत. (हेही वाचा: कोरोना नंतर आता भारत मलेरियाची लस पण करणार एक्सपोर्ट, दुसऱ्या देशातील लोकांचे ही जीव वाचवनार)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिहार सरकारने युनिसेफच्या सहकार्याने राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत रिया कुमारी या मुलीने मुद्दा उपस्थित केला होता की, सरकार शाळांमध्ये सायकल वाटप करत आहे, ड्रेसचे वाटप केले जात आहे. अशा परिस्थितीत मुलींसाठीही 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड का दिले जाऊ शकत नाही?. याला उत्तर देताना महिला आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की, आज तुम्ही सॅनिटरी पॅडची मागणी करत आहात, उद्या कोणीतरी कंडोम मागेल, सरकार आधीच भरपूर गोष्टींचे मोफत वाटप करत आहे. या उत्तरानंतर अधिकाऱ्यावर सोशल मिडियावर भरपूर टीका झाली होती.