भारतामध्ये नुकतेच मोठ्या उत्साहात छटपूजा (Chhath Puja) पर्व साजरे झाले. कार्तिक महिन्याच्या शुक्ल षष्ठीपासून अर्थात दिवाळीनंतर छठ पूजेची सुरुवात होते. छठ पूजा ही सूर्यदेवाची उपासना आहे. बिहारमध्ये या पूजेचे, उत्सवाचे विशेष महत्व आहे. संतानप्राप्तीसाठी, पुण्यसंचयासाठी, सुख-समृद्धीसाठी छठ पुजा केली जाते. मात्र यंदाच्या छटपूजेला मोठे गालबोट लागले. छठ उत्सवादरम्यान बिहारच्या विविध भागांत किमान 33 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली.
रोहतास, सारण, गया आणि सिवान जिल्ह्यात गुरुवारी प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली, तर बिहारशरीफ आणि बक्सर जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला. बेगुसराय जिल्ह्यात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. समस्तीपूर येथे चार जणांचा बुडून मृत्यू झाला तर बेतिया येथे एकाचा मृत्यू झाला. सहरसा आणि खगरियामध्ये प्रत्येकी चार मृत्यूची नोंद झाली, तर सुपौल आणि लखीसरायमध्ये प्रत्येकी दोन मृत्यूची नोंद झाली. मधेपुरा, पूर्णिया आणि भागलपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
दुसर्या अर्घानंतर जेव्हा भक्तगण नदी, तलाव, कालव्यात स्नान करून डुबकी मारत होते तेव्हा ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, अशा धोकादायक घाटांची ओळख पटवण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्यानेच असे अपघात झाले असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. अशा घटनांमुळे बेगुसरायमध्ये जमावाने जिल्हा पोलिसांच्या दोन वाहनांची जाळपोळ केली आणि पोलिसांच्या पथकावर दगडफेकही केली. इतर जिल्ह्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. (हेही वाचा: Mumbai: पगार वेळेवर न दिल्याने मालकाच्या ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण, पोलिसांकडून सुटका)
दरम्यान, धार्मिक मान्यतेनुसार, आपल्या कवचकुंडलाची शक्ती वाढावी, म्हणून कर्ण रोज सकाळी पाण्यात राहून सूर्यदेवाची उपासना करत असे. सूर्याला अर्घ्य देऊन मगच दिवसाची सुरुवात करत असे. द्यूतात सर्व काही हरल्यावर द्रौपदीनेही सूर्याची अर्घ्य देऊन पूजा केली होती.