इंडोनेशिया येथील विमान अपघातानंतर भारतही सावध; विमान कंपन्यांना दिला सतर्कतेचा इशारा
(File image)

इंडोनेशियात झालेल्या विमान अपघातानंतर भारतही सावध झाला आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (DGCA)ने जेट एअरवेज आणि स्पाईसजेट यांच्या बोईंग 737 MAX विमानंमध्ये असलेल्या सेंसरबाबती असलेल्या समस्येवर योग्य ते पाऊल उचलण्यास सांगितले आहे. इंडोनेशियात गेल्या महिन्यात लॉयन एअर कंपनीच्या विमानाला अपघात घडला होता. त्यानंतर अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन ( FAA)कडून बोईंग 737 मॅक्स विमानांबाबत एक मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली. त्यानंतर DGCA नेही असेच निर्देश दिले आहेत.

देशातील विमान कंपन्यांमध्ये प्रमुख असलेल्या जेट एअरवेज आणि स्पाईसजेट या दोन्ही विमान कंपन्या अद्यापही बोईंग 737 मॅक्स विमाने वापरतात. या दोन्ही कंपन्यांकडे अद्याप कमीत कमी 6 विमानं अशा पद्धतीची आहेत. DGCAच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या विमानांमधील सेन्सरची समस्या लवकर दूर करण्यात आली नाही तर, वैमानिकाला (पायलट) विमान कंट्रोल करणे अतिशय कठीण होऊन बसते. त्यामुळे आकाशात उंचावर असलेले विमान भरकटते आणि वेगाने जमीनीकडे झेपावते. (हेही वाचा, Air India चे ग्राउंड स्टाफ कर्मचारी संपावर, विमान उड्डाणाचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल)

लॉयन एअर विमान अपघाताच्या प्राथमिक चौकशीत एफएएने 7 नोव्हेंबरला एमरजन्सी एअरवर्डीनेस डायरेक्टीव्ह (AD) जारी केला होता. बोईंगने या विषयावर 6 नोव्हेंबरला एक बुलेटीनही दिले होते. डीजीएसएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एफएएचे एडी मिळ्याल्यानंतर तीन दिवसांच्या आत विमानात मॅन्यअली बदल करण्यात येतील.