Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

स्तनपान करणाऱ्या मातांनी कोणत्याही प्रकारचा संकोच किंवा भीती न बाळगता कोविड -19 लसीकरण केले पाहिजे. लसीकरणामुळे आईमध्ये विकसित झालेल्या अँटी बॉडीज स्तनपान देताना आपोआप बाळाकडे हस्तांतरित होतात आणि त्या बाळासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे भारतीय वैद्यकीय परिषदेचे महामारी विज्ञान व संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख समीरण पांडा यांनी म्हटले आहे. (Covid-19 Vaccine for Pregnant Woman: कोविड-19 लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित- ICMR)

कोरोना लसी या कोविड-19 च्या वेगवेगळ्या स्ट्रेन विरुद्ध प्रभावी आहेत का? असा प्रश्न आपल्याकडे अनेकांना पडला आहे. डॉ. पांडा यांच्या म्हणण्यानुसार, आता उपलब्ध असलेल्या लसी नवीन व्हेरिएंटवर बऱ्यापैकी प्रभावी आहेत. या लसी संसर्ग प्रतिबंध करत नाहीत तर रोगात सुधारणा करतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयसीएमआरच्या प्रयोगांनी हे सिद्ध केले आहे की भारतात सध्या उपलब्ध असलेल्या लसी नव्या व्हेरिएन्टविरोधात देखील प्रभावी आहेत. मात्र परिणामकारकता वेगवेगळ्या स्ट्रेन्स साठी भिन्न असू शकते.

लोक देखील सावध आहेत की त्यांनी घेतलेली लस काही काळानंतर प्रभावी ठरणार नाही कारण विषाणू वेगाने बदलत आहे. मात्र डॉ. पांडा असे म्हणतात की विषाणू बदलतात तेव्हा सर्व विषाणूत उत्परिवर्तन सामान्य असते. तज्ञांनी असे सूचित केले आहे की कोविड -19 विषाणूचे अस्तित्व काही काळानंतर इन्फ्लुएन्झा प्रमाणे कायम राहील (एंडेमिक) आणि असुरक्षित लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते. डॉ. पांडा म्हणाले की 100 वर्षांपूर्वी फ्लू म्हणून ओळखला जाणारा इन्फ्लुएंझाही देखील महामारी होती. मात्र आता तो सर्वत्र आढळतो. त्याचप्रमाणे, कोविड-19 च्या बाबतीत हळूहळू तो महामारीच्या टप्प्यावरून एंडेमिक बनू शकेल. सध्या आम्ही वृद्धांना दरवर्षी फ्लू रोधक लस घेण्याची शिफारस करतो. इन्फ्लूएंझा विषाणू बदलत असल्यामुळे आम्ही त्यानुसार लसी मध्ये छोटे बदल करत असतो. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

अँटीबॉडी चाचण्या करून घेणे व्यर्थ आहे: डॉ. समीरण पांडा

डॉ. समीरण पांडा पुढे म्हणतात की, अँटीबॉडी चाचण्या करणे व्यर्थ आहे कारण रोगप्रतिकार शक्ती केवळ अँटीबॉडीजवर अवलंबून नाही. बाजारात उपलब्ध असणारी व्यावसायिक किट वापरुन केलेल्या तपासणीत आढळलेल्या अँटी बॉडीज कोविड रोगापासून बचाव करू शकणार्‍या अँटीबॉडीजच असतील असे आवश्यक नाही. डॉ. पांडा स्पष्ट करतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते तेव्हा दोन प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. एक अँटी बॉडी बचाव करणारी असते किंवा अँटी-बॉडी मिडिएटेड प्रतिकारशक्ती म्हणून ओळखली जाते. दुसरी सेल मिडिएटेड प्रतिकारशक्ती आहे. तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे इम्यून मेमरी. लसीकरणानंतर इम्यून मेमरी तयार होते आणि ती पेशींमध्ये असते. जेव्हा जेव्हा विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा ती सक्रिय होते.

लस पूर्णपणे सुरक्षित आहेत

डॉ. समीरण पांडा यांनी स्पष्ट केले की, दमा, धुळीची ऍलर्जी, परागकणांची ऍलर्जी इत्यादीसारख्या सामान्य ऍलर्जी असलेले लोक देखील ही लस घेऊ शकतात. सह-व्याधी रुग्ण स्थिर असल्यास लस घेऊ शकतात. मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना लसीकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे कारण त्यांना जास्त धोका आहे. “सध्या भारतात उपलब्ध असलेल्या सर्व लसी क्लिनिकल चाचण्यांच्या तीन टप्प्यातून गेल्या आहेत. सुरक्षेची चाचणी पहिल्या टप्प्यातच केली जाते. नंतरच्या टप्प्यात रोग प्रतिकारशक्ती आणि परिणामकारकतेची चाचणी घेतली जाते. डॉ. पांडा म्हणाले की, मी सर्वांना आश्वस्त करतो की या लस पूर्णपणे सुरक्षित आहेत.” कोविड लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होणे आणि एईएफआय (लसीकरणानंतरचा प्रतिकूल परिणाम ) होण्याची शक्यता भारतात खूप कमी आहे.

जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या लसी काही काळानंतर भारतात येतील. त्यामुळे त्या लसींची वाट न पाहता आता देशात उपलब्ध असलेली लस घेणे हाच उत्तम पर्याय असल्याची सूचना डॉ पांडा यांनी केली. डॉ. पांडा यांनी सांगितले की , कृपया समजून घ्या की लोक इतर लसींची वाट पहात आहेत ज्या त्याना अधिक सोयीस्कर किंवा श्रेष्ठ वाटतात, मात्र विषाणू थांबत नाही. देशात अजूनही हा विषाणू पसरत आहे. तुम्ही प्रतीक्षा करत असताना तुम्हाला संसर्ग झाल्यास तुम्ही काय कराल असा प्रश्न त्यांनी केला.

डॉ. पांडा म्हणाले की नवीन व्हेरिएन्टच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय आणि कोविड -19 च्या उपचारांमध्ये कोणताही बदल सुचवण्यात आला नाही. “सर्व उत्परिवर्तन , मग ते विषाणूचे स्ट्रेन्स पसरवणारे असतील किंवा नवीन व्हेरिएन्टस असतील , प्रसाराचे माध्यम सारखेच आहे. मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे या विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्याच्या अजूनही प्रभावी पद्धती आहेत. ”

कोविड -19 च्या उपचारांबाबत बोलायचे तर कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएन्ट्सच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सध्याच्या प्रमाणित उपचार पद्धती बदलण्याची गरज वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले