Covaxin: कोवॅक्सिनचे दोन्ही डोस लक्षणात्मक कोरोना रूग्णांवर फक्त 50% पर्यंत प्रभावी; AIIMS  च्या अभ्यासात दावा
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोवॅक्सिनचे (Covaxin) दोन्ही डोस कोरोना विषाणूची (Coronavirus) लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे. परंतु, पूर्वी द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अंतरिम अभ्यासाच्या परिणामांवरून असे दिसून आले होते की कोवॅक्सिनचे दोन डोस, ज्याला BBV152 म्हणूनही ओळखले जाते, लक्षणात्मक रोगाविरूद्ध 77.8 टक्के प्रभावी होते. पण आता भारतात केलेल्या एका अभ्यासात ते 50 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

नवीन अभ्यासात 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीत दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मधील 2,714 रूग्णालयातील कर्मचार्‍यांचे मूल्यांकन केले गेले, ज्यांच्यामध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळली होती व निदान करण्यासाठी त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली. संशोधकांनी नमूद केले की या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की डेल्टा प्रकार हा भारतातील सर्वात धोकादायक स्ट्रेन होता. देशात सर्व पुष्टी झालेल्या COVID-19 प्रकरणांपैकी जवळपास 80 टक्के प्रकरणे डेल्टा प्रकाराची होती.

प्रोफेसर मनीष सोनेजा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आमचे निष्कर्ष असे पुरावे देतात की जलद लस रोलआउट कार्यक्रम हा महामारी नियंत्रणाचा सर्वात आशादायक मार्ग आहे, तर सार्वजनिक आरोग्य धोरणांमध्ये मास्क घालणे आणि सामाजिक अंतर यांसारख्या अतिरिक्त संरक्षणात्मक उपायांचा समावेश आहे.’ दरम्यान, कोवॅक्सिन ही हैदराबादस्थित भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (NIV-ICMR), पुणे यांच्या सहकार्याने विकसित केलेली लस आहे. या लसीचे 28 दिवसांच्या अंतराने दोन-डोस दिले जातात. (हेही वाचा: Jaipur: जयपूरमधील हॉस्पिटलमध्ये 54 वर्षीय महिला रुग्णाच्या यकृतातून 8.5 किलो वजनाचा ट्यूमर काढला)

या वर्षी जानेवारीमध्ये, भारतात 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांवर या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वापरायच्या कोविड-19 लसींच्या यादीत त्याचा समावेश केला. भारतातील COVID-19 च्या दुसर्‍या लाटेच्या वाढीदरम्यान आरोग्यसेवा कर्मचार्‍यांवर नवीनतम अभ्यास केला गेला, ज्यांना मुख्यत्वे कोवॅक्सिन दिले जात होते.