बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) मध्ये नीतीश कुमार (Nitish kumar) यांच्या संयुक्त जनता दलाने (JDU) शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर आक्षेप घेतला. त्यामुळे निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेला 'बिस्किट' हे चिन्ह दिले. परंतू, हे चिन्ह घ्यायला नकार देत खट्टू झालेल्या शिवसेनेने निवडणूक आयोगाला आपली नाराजी कळवली. त्यानंतर निवडणूक आयोगानेही 'प्रसन्न' होत शिवसेनेला बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह बदलून दिले आहे. त्यामुळे शिवसेना (Shivsena) आता 'तुतारी (Tutari) फुंकणारा मावळा' (Tutari Playing Mawla) या निवडणूक चिन्हावर बिहार विधानसभा निवडणूक लढणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी कोणतेही एक चिन्ह निवडणूक आयोगाने द्यावे, अशी शिवसेनेची मागणी होती. परंतू, इतर राजकीय पक्ष अथवा उमेदवारांनी ही तिन्ही चिन्हं आगोदरच आरक्षित केली होती. त्यामुळे शिवसेनेला ही चिन्हे मिळू शकली नाहीत. अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीटाऐवजी 'तुतारी वाजवणारा मावळा' हे निवडणूक चिन्ह दिले आहे. शिवसेनेनेही या चिन्हाला पसंती दिली आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणूकसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या 'बिस्कीट' या चिन्हाच्या निर्णयावर शिवसेनेचा आक्षेप)
दरम्यान, शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे दोन्ही पक्ष स्थानिक नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या धनुष्यबाण या चिन्हामुळे आमच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असा आक्षेप नितीश कुमार (Nitish kumar) यांच्या JDU ने घेतला होता. जदयूचा आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षास 'बिस्किट' हे निवडूक चिन्ह दिले होते. मात्र, शिवसेनेच्या नाराजीनंतर आयोगाने पुन्हा चिन्ह बदलून देत 'तुतारी वाजवणारा मावळा' हे चिन्ह दिले. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: शिवसेना धनुष्यबाणाचा घेतला नीतीश कुमार यांनी धसका; JDU पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव)
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50 जागा लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेने मोर्चेंबांधणी करत स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. या यादीत मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह 20 नावांची घोषणा केली आहे.