Bihar Assembly Election 2020: शिवसेना धनुष्यबाणाचा घेतला नीतीश कुमार यांनी धसका; JDU पक्षाची निवडणूक आयोगाकडे धाव
Shiv Sena | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाची प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष अशी ओळख असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता कात टाकते आहे. शिवसेना हळूहळू राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल करते आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेर विविध राज्यांमध्ये शिवसेनेला मिळत असलेले समर्थनही लक्षवेधी आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) मध्ये शिवसेना किमान 50 जागा लढवेल अशी शक्यता आहे. असे असानाच मुख्यमंत्री नीतीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेड (JDU) पक्षानेही धसका घेतला आहे. त्यामुळे नीतीश कुमार यांनी चक्क निवडणूक आयोगाकडेच धाव घेतली असून, शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.

बिहारमध्ये बाण हे जनता दल युनायटेड पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. महाराष्ट्रात हेच निवडणूक चिन्ह शिवसेनेचे आहे. अर्थात जदयु आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची निवडणूक चिन्ह धनुष्य बाण असली तरीही दोन्हींच्या रचनेत कमालीचा फरक आहेच. तरीही नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायडेला आक्षेप आहे की, शिवसेना धनुष्यामुळे जदयुच्या मतांवर परिणाम होतो. (हेही वाचा, Bihar Assembly Elections 2020: अॅड. प्रकाश आंबेडकर किंग मेकर की एण्ट्रीपूरते मर्यादित? बिहार निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणाच्या फायद्याची?)

नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने आक्षेप घेताना म्हटले आहे की, शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे दोन्ही पक्ष स्थानिक नाहीत. त्यामुळे या पक्षांना धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह देण्यात येऊ नये. या दोन्ही पक्षांना धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह मिळाले तर सर्वसामान्य मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. दरम्यान, जनता दल युनायटेडच्या आक्षेपानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह घेता येणार नाही, असे आदेश दिल्याचे वृत्त आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहीने याबाबत वृत्त दिले आहे.

नीतीशु कुमार यांच्या आक्षेपानंतर शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी टीका केली आहे की, बिहारमध्ये शिवसेना मतांचा आलेख चढता दिसतो आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी शिवसेना धनुष्यबाणाचा धसका घेतला आहे. त्यामुळेच त्यांनी आक्षेप घेतल्याचे अनिल देसाई यांनी म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे असलेला फ्री सिंबॉल शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी आम्ही आयोगाला केल्याचेही देसाई यांनी या वेळी सांगितले.