बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) अद्याप जाहीर झाली नाही. कोरना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे ही निवडणूक 2020 मध्ये पार पडणार की 2021 उजाडणार याबाबतही निश्चिती नाही. राजकीय पक्षांनी मात्र तोपर्यंत बिहारमध्ये विधानसभा निवडणूक (Bihar Assembly Election) प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. बिहार (Bihar) विधानसभेतील आमदारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांवरील एक धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. असोशिएशन ऑफ टेमोक्रेटिक रिफार्म्स अहवालातून पुढे आलेल्या आकडेवारीनुसार खुलासा झाला आहे की, बिहार विधानसभेत एकूण 240 पैकी चक्क 136 आमदार विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. अहवालानुसार सर्वाधिक गुन्हे राष्ट्रीय जनता दल (राजद) पक्षातील आमदारांवर दाखल आहेत. राजदमधील 41% आमदार विविध प्रकरणांमध्ये आरोपी आहेत किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
असोशिएशन ऑफ टेमोक्रेटिक रिफार्म्स अहवाल सांगतो की, राजद खालोखाल काँग्रेस आणि त्यापाठोपाठ भाजप आमदारांचा क्रमांक लागतो. जनता दल युनायडेट (जदयू) चे 37 तर भाजपचे 35% आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. विधानसभा निवडणूक 2015 मध्ये उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे संबंधित अहवालात आकडेवारी दिली गेली आहे.
दरम्यान, हत्या अथवा हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्याबाबत बोलायचे तर 11 आमदारांवर हत्या आणि 30 आमदारांवर हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. 5 आमदारांवर महिलांसोबत गैरवर्तन आणि एका आमदारावर अत्याचाराचा आरोप आहे.(हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: 'हम' करणार नितीश कुमार यांच्या पक्षाशी आघाडी- जीतन राम मांझी)
आमदारांच्या मालमत्ता आणि इतर संपत्तीबाबतही या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार, 240 पैकी 67% आमदार करोडपती आहेत. खगरिया विधानसभा मतदारसंघातील जेडीयू आमदार पूनम देवी सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे. भागलपूर येथील काँग्रेस आमदार अजीत शर्मा यांच्या जवळ 40 कोटी रुपयांची संपत्ती आहे. रानींगज येथील जतना दल आमदार अचिमित रशिवदेव यांची संपत्ती 9.6 लाख रुपये आहे.
अहवालात असेही सांगितले आहे की, 240 आमदारांपैकी 134 आमदार पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहेत. 96 आमदार पदवीधर आहेत तर 9 आमदार केवळ साक्षर आहेत.