Bharat Biotech Covaxin Update: भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन'ची प्राण्यांवर यशस्वी चाचणी; माकडांमध्ये Coronavirus च्या Antibodies केल्या विकसित
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाची संख्या 46 लाखांवर गेली आहे. दरम्यान, कोरोना लसीशी (Coronavirus Vaccine) संबंधित एक चांगली बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोना लस 'कोवॅक्सिन' (Covaxin) च्या लसीची प्राण्यांवर चाचणी यशस्वी झाली आहे. कोवॅक्सिनने माकडांमध्ये विषाणूची प्रतिपिंडे विकसित केली आहेत. म्हणजेच, लॅब व्यतिरिक्त, ही लस जिवंत शरीरात देखील प्रभावी आहे, हे सिद्ध झाले आहे. माकडांवरील अभ्यासाच्या निकालांमध्ये लसची रोगप्रतिकारक शक्ती दिसून आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारत बायोटेकने काही प्रकारच्या माकडांना (Macaca Mulata) या लसीचा डोस दिला. या लसीची फेज 1 क्लिनिकल ट्रायल भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण झाली आहे.

आता सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने या महिन्यात भारत बायोटेकला फेज 2 चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. भारत बायोटेकने 20 माकडांना चार गटात विभागून संशोधन केले. एका गटाला प्लेसबो देण्यात आला तर इतर तीन गटांना आधी व 14 दिवसांच्या नंतर तीन वेगवेगळ्या प्रकारची लस दिली गेली. दुसर्‍या डोसनंतर सर्व माकडांना SARS-CoV-2 शी एक्स्पोज केले  गेले. लसच्या पहिल्या डोसच्या तिसर्‍या आठवड्यापासून, माकडांमध्ये कोविडला प्रतिसाद मिळायला लागला. लस घेतलेल्या कोणत्याही माकडात निमोनियाची लक्षणे आढळली नाहीत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च  (ICMR) - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तपणे कोवाक्सिन विकसित केले आहे. भारत बायोटेकने 29 जून रोजी लस तयार केल्याची घोषणा केली. कोवॅक्सिन ही आयसीएमआर-भारत बायोटेकची 'निष्क्रिय' लस आहे. हे अशा कोरोना विषाणूच्या कणांपासून बनलेले आहे ज्यास मारले गेले, जेणेकरून त्यांचा संसर्ग होऊ शकणार नाही. कोविडचा हा स्ट्रेन पुण्याच्या एनआयव्ही लॅबमध्ये आसोलेट करण्यात आला, त्याच्या डोसमुळे शरीरात विषाणूविरूद्ध प्रतिपिंडे बनतात. (हेही वाचा: गेल्या 24 तासात देशात 81,533 जणांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर 77.77 टक्क्यांवर)

भारतात बनवलेल्या कोवॅक्सिनच्या पहिल्या कोरोना लसची फेज 1 चाचणी 15 जुलै 2020 पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील चाचण्या देशभरात 17 ठिकाणी पार पडल्या. कोवाक्सिन चाचणीचा सर्व तपशील आयसीएमआरला पाठविला जाईल. दरम्यान, देशात  Bharat Biotech, Zydus Cadila, Serum Institute, Mynvax Panacea Biotec, Indian Immunologicals आणि Biological E अशा किमान सात कंपन्या कोरोना विषाणूच्या वेगवेगळ्या लसींवर काम करत आहेत.