Bengaluru Water Crisis: भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाणारी कर्नाटकची राजधानी बंगळुरू (Bengaluru) सध्या मोठ्या जलसंकटाचा (Water Crisis) सामना करत आहे. शहरातील पाणी टंचाई इतकी वाढली आहे की, प्रशासनाने कार धुणे, बागेतील झाडांना पाणी घालणे इत्यादी कामांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत. एवढेच नाही तर आदेशाचे उल्लंघन केल्यास मोठा दंडही आकारण्यात येणार आहे. बेंगळुरू पाणी पुरवठा आणि सांडपाणी मंडळ म्हणजेच BWSSB ने आदेश जारी केले आहेत. कार धुणे, बांधकाम किंवा कारंज्यासारख्या मनोरंजनासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
या आदेशाचे पालन न केल्यास 5 हजार रुपयांच्या दंडाचीही तरतूद आहे. त्याच वेळी, कोणी वारंवार त्याचे उल्लंघन केल्यास, दररोज अतिरिक्त 500 रुपये आकारले जातील. आदेशात म्हटले आहे की, 'BWSSB कायदा 1964 च्या कलम 33 आणि 34 अंतर्गत, पिण्याच्या पाण्याच्या वापरावर अत्यावश्यक कारणांशिवाय बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.'
दुसरीकडे एका Reddit वापरकर्त्याने एका पोस्टमध्ये दावा केला आहे की, बेंगळुरूमध्ये पाण्याची संकट परिस्थिती इतकी गंभीर आहे की रहिवाशांना मॉल्समध्ये शौचालय वापरण्यास भाग पाडले जात आहे. इंटरनेटवर फिरत असलेल्या या पोस्टने बेंगळुरूमधील प्रतिकूल परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘शहरातील बहुतेक भाडेकरूंनी घर सोडले आहे, तर काहींनी तात्पुरत्या निवासस्थानात स्थलांतर केले आहे. पॉश फ्लॅट मालक टॉयलेट वापरण्यासाठी मॉल्समध्ये जात आहेत. एक काळ असा होता की, जेव्हा बंगळुरूच्या मॉल्समध्ये लोक स्टार्ट अप कल्पनांवर चर्चा करत होते आणि आता लोक त्याचा वापर आंघोळीसाठी आणि शौचालयासाठी करत आहेत, कारण त्यांच्या 1.5cr फ्लॅटमध्ये पाणी नाही.’ (हेही वाचा: Bengaluru Water Crisis: बेंगळुरू करत आहे भीषण जलसंकटाचा सामना; ऑनलाईन सुरु झाल्या शाळा-कोचिंग, टँकरच्या किमती दुप्पट, जाणून घ्या परिस्थिती)
दरम्यान, गुरुवारी कर्नाटक सरकारने खासगी पाण्याच्या टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचा आदेश जारी केला. विशेष म्हणजे यापूर्वी 6 हजार लिटरची टाकी 450 ते 600 रुपयांना मिळत होती, मात्र परिस्थिती बिकट झाल्याने भाव 2000 ते 3000 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे सरकारने दर निश्चित केले आहेत. नवीन नियमांनुसार, 5 किमीच्या परिघात 6 हजार लिटरच्या टँकरची किंमत 600 रुपये, 8000 लिटर 700 रुपये आणि 12000 लिटरच्या टँकरची किंमत 1 हजार रुपये आहे. त्याच वेळी, 5 किमीपेक्षा जास्त आणि 10 किमीपेक्षा कमी अंतरासाठी, 750 रुपये (6 हजार लिटर), 850 रुपये (8 हजार लिटर) आणि 1200 रुपये (12 हजार लिटर) दर निश्चित करण्यात आले आहेत.