Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Bengaluru Water Crisis: भारतातील आयटी सिटी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्णता वाढत असताना पाण्याची मागणी वाढत आहे. 7 मार्च रोजी बेंगळुरूमध्ये किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस होते. अशात शहरात गेले काही दिवस तीव्र पाणी संकट (Water Crisis) उभा राहिले आहे. मार्चच्या या उन्हात लोक पाण्यासाठी तळमळत आहेत. जलसंकटाचा सामना करणाऱ्या बेंगळुरूमध्ये लोक काटकसरीने पाणी खर्च करत आहेत. उद्योगधंदेही चिंतेत आहेत. विजयनगरसह शहरातील अनेक शाळा आणि कोचिंग सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. आठवडाभर ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत.

बेंगळुरूच्या कुमारकृपा रोडवरील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यालय-सह-निवासस्थानात पाण्याचे टँकर दिसले यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. यासह उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वत: सांगितले की, बेंगळुरूच्या सदाशिवनगरमधील त्यांच्या घराची बोअरवेल पहिल्यांदाच कोरडी आहे. सदाशिवनगर हे सांकी तलावाच्या काठावर वसलेले आहे.

बेंगळुरूला कावेरी नदीच्या पाण्याची पातळी घसरल्याने पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बेंगळुरूमध्ये 3000 हून अधिक बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. घरांमध्ये पाणीपुरवठ्याचा कालावधी कमी झाला आहे. बेंगळुरू पाणी पुरवठा आणि सीवरेज बोर्ड (BWSSB) च्या मते, बेंगळुरूच्या बाहेरील भागात परिस्थिती अधिक गंभीर आहे. 2023 मध्ये पावसाअभावी संपूर्ण कर्नाटक, विशेषत: बेंगळुरू अलीकडच्या काही काळात सर्वात भीषण जलसंकटाचा सामना करत आहे.

पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अशी आहे की, पूर्वी लोकांना 1000 लिटरच्या पाण्याच्या टँकरसाठी 600 ते 800 रुपये मोजावे लागत होते, आता 1800 ते 2000 रुपये मोजावे लागत आहेत. टँकरवाल्यांची मनमानी पाहता जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांच्या कालावधीसाठी 200 खाजगी टँकरचे दर निश्चित केले आहेत. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे 200 खासगी टँकर कंत्राटी तत्त्वावर तैनात करण्यात आले आहेत. 5 किमी अंतरासाठी 6,000 लिटरच्या पाण्याच्या टँकरची किंमत 600 रुपये आहे. 8,000 लिटर आणि 12,000 लिटरच्या टँकरची किंमत अनुक्रमे 700 आणि 1,000 रुपये आहे. 5 किमी आणि 10 किमी अंतराच्या अंतरासाठी, 6,000 लिटर पाण्याच्या टँकरची किंमत 750 रुपये आहे. 8,000 लिटर आणि 12,000 लिटरच्या टँकरसाठी अनुक्रमे 850 रुपये आणि 1,200 रुपये मोजावे लागतील. बेंगळुरूची सुमारे 60 टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. (हेही वाचा: Bengaluru Female Foeticide Case: धक्कादायक! बेंगळुरूमधील नेलमंगला येथील रुग्णालयात 74 भ्रूणहत्या; डॉक्टर आणि मालक फरार, Asare Hospital विरोधात गुन्हा दाखल)

सिद्धरामय्या यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकातील 136 तालुक्यांपैकी 123 तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे आणि 109 तालुके तीव्र जलसंकटाचा सामना करत आहेत. कर्नाटक सरकारनेही जलसंकट दूर करण्यासाठी तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरांना पुरेसा पाणीपुरवठा व चारा मिळावा यासाठी तालुकास्तरावर आमदारांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.