शोभन सरकार निधन (संग्रहित संपादित प्रतिमा)

उन्नावच्या (Unnao) दौंडिया खेड्यात सोने असल्याचा दावा केल्याने चर्चेत आलेल्या संत शोभन सरकार (Shobhan Sarkar) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या भक्तांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. आज सकाळी पाचच्या सुमारास बाबा शोभन सरकार यांनी त्यांच्या आश्रमातील आरोग्यधाम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कानपूर (Kanpur) येथील शिवली कोतवाली भागात त्यांचा आश्रम आहे. उन्नाव आणि आसपासच्या भागात शोभन सरकार यांचा चांगलाच प्रभाव आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

कानपूरच्या बिठूरमधील बंदी माता घाटावर बुधवारी दुपारी बाबा शोभन सरकार यांचे पार्थिव गंगेमध्ये दहन करण्यात आले. या वेळी सामाजिक अंतराचा नियम डावलून हजारो बाबा भक्त तेथे उपस्थित होते. या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शोभन सरकार यांचे पार्थिव बिठूरस्थित स्थानातील बंदी माता घाट येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लोक तिथे पोचले, पण सामाजिक अंतर पाळले नाहीत.

शोभन सरकार यांनी काही वर्षांपूर्वी असा दावा केला होता की, उन्नावच्या दौंडियाखेडा गावाजवळील रेवा नरेशच्या (Rao Ram Baksh Singh) किल्ल्यात शिव चबुतऱ्याजवळ 1000 टन सोने गाडले आहे. त्यांना ही गोष्ट स्वप्नात दिसली होती व सरकारने हे सोने बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी सांगितले होते. जेव्हा सरकारने त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवायचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी या गोष्टीची चेष्टा केली होती. मात्र उत्खनन केल्यानंतर तिथे काहीच सापडले नाही. त्यावेळी या विषयावर बरेच राजकारणही झाले होते. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ट्रेझरीच्या वितरणाबाबत वादही सुरु होते. (हेही वाचा: भारतासाठी पुढील 30 दिवस महत्वाचे, कोरोना व्हायरसची दीड ते साडेपाच लाख प्रकरणे समोर येण्याची शक्यता- IIT Guwahati, Duke-NUS Singapore यांचा दावा)

दरम्यान, शोभन सरकार यांचा जन्म कानपूर भागातल्या शिवली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित कैलाशनाथ तिवारी होते. असे म्हटले जाते की 11 व्या वर्षी शोभन सरकार यांना वैराग्य प्राप्त झाले. शोभन सरकार यांनी गावातील लोकांसाठी अनेक जनहिताची कामे केली आहेत, यामुळेच ग्रामस्थ त्यांना देवाचे रूप मानतात. फक्त कानपूरच नाही, तर जवळपासच्या अनेक जिल्ह्यात त्यांचे भक्त आहेत.