Queen Elizabeth II Funeral: राष्ट्रपती Draupadi Murmu ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार; 17-19 सप्टेंबर दरम्यान लंडनला भेट देणार
Draupadi Murmu | (Photo Credit - Twitter)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth ||) यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी युनायटेड किंगडमला (UK) जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीनेसंवेदना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनला भेट देतील. राणीचे अंत्यसंस्कार 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

हा दिवस ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हेही राणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही लंडनला भेट देणार आहेत. ब्रिटनच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पार्थिव मंगळवारी संध्याकाळी स्कॉटलंडहून लंडनला पोहोचले.

त्यांची शवपेटी काल रात्री बकिंगहॅम पॅलेसमध्ये ठेवण्यात आली. बुधवारपासून चार दिवस राणीची शवपेटी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात येणार असून सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एडिनबर्ग विमानतळावरून राणीची शवपेटी लंडनसाठी पाठवण्यात आली तेव्हा तिथे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. राणीची शवपेटी तिची मुलगी प्रिन्सेस अॅनसोबत, रॉयल एअर फोर्स (RAF) विमानाने लंडनला आणली. ज्या विमानातून राणीची शवपेटी आणली गेली होती ते विमान मानवतावादी मदतीसाठी यापूर्वी वापरले गेले आहे. (हेही वाचा: इंग्लंडचा नवा राजा चार्ल्स तिसरा यांना मिळणार शाही सुविधा, जाणून घ्या Royal Service बद्दल)

पश्चिम लंडनमधील आरएएफच्या नॉर्थहॉल्ट हवाई तळावर विमान उतरताच राणीची शवपेटी रस्त्याने मध्य लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये नेण्यात आली. मंगळवारी किंग चार्ल्स तिसरे हे शवपेटी स्वीकारण्यासाठी पत्नी कॅमिलासह शाही निवासस्थानी आधीच पोहोचले होते. शवपेटी लंडनला पोहोचण्यापूर्वी आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये पाठवण्यापूर्वी आरएएफकडून सलामी देण्यात आली होती. राणीचे वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसल येथे गुरुवारी निधन झाले. त्यांनी 70 वर्षे ब्रिटनवर राज्य केले.