Funeral Service: खांदा देण्यापासून अग्निपर्यंत अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करेल 'ही' मुंबईमधील स्टार्टअप कंपनी; जाणून घ्या शुल्क
Funeral Service (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल लोक दररोज नवनवीन रोजगाराच्या संधी शोधून काढत आहेत. कोरोना नंतर तर अनेक लोकांनी कल्पकतेने आपले नवीन व्यवसाय सुरू केले. असेच काहीतरी नवीन करण्याचा विचार करून मुंबईतील एका व्यक्तीने अंत्यसंस्कारासाठी सर्व प्रकारची सेवा (Funeral Service) पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. मुंबई व्यापार मेळ्यातील एका स्टार्टअपच्या स्टॉलच्या चित्राने सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे. या फोटोवरून दिसत आहे की, लोकांना अंत्यसंस्काराची सेवा देणारी ही कंपनी आहे.

हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये प्रश्नही विचारला आहे की, ‘अशा 'स्टार्टअप'ची गरज का पडेल?’. शेअर केलेल्या फोटोवरून कळते की, कंपनीचे नाव सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही अशी एक संस्था आहे जी जीवनाला सन्मानपूर्वक निरोप देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे.

वेबसाइटनुसार, या ठिकाणी हॉस्पिटल किंवा घरापासून स्मशानभूमीपर्यंत अंत्यसंस्कारासाठी सर्वसमावेशक सेवा (माणूस, साहित्य आणि शरीर) प्रदान केली जात आहे. एवढेच नाही अस्थींचे विसर्जनही कंपनी करणार आहे. म्हणजे अंतिम संस्काराशी संबंधित सर्व विधी कंपनीच करणार आहे. सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम संस्कारासाठीच्या सर्व व्यवस्थेचे शुल्क कंपनीने 37,500 रुपये ठेवले आहे. (हेही वाचा: Restaurant Bill Viral: हॉटेलचे 1985 मधील बिल व्हायरल, किंमत पाहून नेटीझन्स थक्क, म्हणाले 'अरेच्चा! इतके कमी?')

हा फोटो शेअर झाल्यापासून या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. आयएएस अधिकाऱ्याप्रमाणेच अनेक यूजर्सनी अशा सेवेची गरज काय? असा सवाल केला आहे, तर अनेक यूजर्सनी पोस्ट रिट्विट करून यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘लोक काहीही सुरू करतात...’. आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘हे खूप दुःखद आहे.. असे होऊ नये.’ आणखी एका युजरने अशा गोष्टी परदेशात कॉमन असल्याचे सांगितले आहे.