Covishield सह अजून 4 कोरोना विषाणू लसींवर काम करत आहे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया; जाणून घ्या सविस्तर
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कालपासून देशामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India) मुळे हे लवकर शक्य झाले. आता या जगातील सर्वात मोठ्या लसी उत्पादक कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या म्हणण्यानुसार, कोव्हिशिल्डशिवाय (Covishield) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोना व्हायरसच्या आणखी चार लसांवर काम करीत आहे. जाधव यांनी वेबिनार दरम्यान माहिती दिली की, कंपनी कोरोना विरुद्धच्या एकूण 5 लसांवर काम करीत आहे. यामध्ये कोव्हिशिल्डचाही समावेश आहे, ज्याला सामूहिक लसीकरण मोहिमेमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली आहे.

सुरेश जाधव म्हणाले की, 'आमच्या एका लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी मिळाली आहे व तीन इतर लसी वैद्यकीय अभ्यासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. एजून एक लस चाचणीच्या पूर्व-क्लिनिकल अवस्थेत आहे,' सीरमने भारत आणि इतर देशांकरिता संभाव्य कोविड-19 लस तयार करण्यासाठी Novavax Inc बरोबर भागीदारी केली आहे. अमेरिकेच्या औषध विकसकाशी केलेल्या कराराअंतर्गत, पुण्याची औषध निर्माता कंपनी Novavax's लसीचे वर्षाकाठी दोनशे कोटी डोस विकसित करेल.

यूएसच्या Codagenix ची कोरोना व्हायरस लस तयार करणे आणि पुरवण्यासाठी सीरमने त्यांच्याशीही भागीदारी केली आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका/ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने तयार केलेल्या लसीला भारतामध्ये 3 जानेवारीला मंजुरी मिळाली. यासह भारताच्या औषध नियामकाने भारत बायोटेकच्या कोवाक्सिनलाही मंजुरी दिली. (हेही वाचा: स्वदेशी Covaxin लस घेण्यास देशातील काही डॉक्टरांनी दिला नकार)

दरम्यान, आजपासून भारतामध्ये व्यापकरित्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या लसीकरणात भाग घेण्यासाठी CoWIN App वर नोंदणी करणे आवश्यक होते. मात्र आता राज्यात CoWIN App वर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू लसीकरण 18 जानेवारीपर्यंत तात्पुरते स्थगित केले गेले आहे. देशात पहिल्याच दिवशी 1 लाख 91 हजार 181 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. यासाठी देशभरात 3351 लसीकरण केंद्रे उभारली गेली आहेत.