
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सैन्य तणावाच्या (India and Pakistan tension) पार्श्वभूमीवर, नागरी विमान वाहतूक नियामक प्राधिकरण (DGCA) ने 9 मे 2025 पासून 15 मे 2025 (सकाळी 5:29 IST) पर्यंत उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय 7 मे 2025 रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हल्ल्यांनंतर आणि त्यानंतर पाकिस्तानने सीमेवर केलेल्या गोळीबारामुळे घेण्यात आला आहे. प्रभावित विमानतळांमध्ये श्रीनगर, अमृतसर, जम्मू, लेह, चंदीगड, जोधपूर, भुज, जामनगर, जयसालमेर आणि बिकानेर यासारख्या प्रमुख विमानतळांचा समावेश आहे.
विमानतळ प्राधिकरण ऑफ इंडिया (AAI) आणि संबंधित हवाई वाहतूक यंत्रणांनी नोटिस टू एअरमेन (NOTAMs) जारी करून ही माहिती दिली आहे. डीजीसीएने 10 मे 2025 रोजी पहाटे एक निवेदन जारी करून सांगितले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सैन्य संघर्षामुळे आणि ऑपरेशनल कारणांमुळे, 9 मे 2025 पासून 14 मे 2025 (15 मे 2025, सकाळी 5:29 IST) पर्यंत 32 विमानतळांवरील सर्व नागरी उड्डाणे बंद राहतील. हा निर्णय 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला, ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता.
भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तान-प्रायोजित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ गटाला जबाबदार ठरवले आहे. प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, ज्यामुळे 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या सैन्य कारवायांमुळे हवाई सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतातील विमानतळांवर, जे भारतीय हवाई दलाच्या प्रमुख तळांच्या जवळ आहेत.
प्रभावित विमानतळांची यादी-
डीजीसीएने खालील 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे बंद करण्याची घोषणा केली आहे:
अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालीया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरसावा, शिमला, श्रीनगर, थोइसे, उत्तरलाई. (हेही वाचा: Leaves Cancelled at AIIMS Delhi: मोठी बातमी! दिल्ली एम्स रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द)
याशिवाय, दिल्ली आणि मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन्स (FIRs) मधील 25 हवाई मार्गांचे खंड (रूट सेगमेंट्स) जमिनीपासून अमर्याद उंचीपर्यंत बंद राहतील. डीजीसीएने विमान कंपन्यांना पर्यायी मार्गांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. या बंदीमुळे उत्तर आणि पश्चिम भारतातील हवाई प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे. प्रमुख विमान कंपन्यांनी आपली उड्डाणे रद्द केली आहेत.