देशाची राजधानी दिल्लीमधील (Delhi) लोक आधीच वायू प्रदूषणाच्या (Air Pollution) समस्येशी झगडत आहेत. अशा परिस्थितीत ही बातमी दिल्लीकरांसाठी नकारात्मक ठरू शकते. इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चचे (ICMR) डायरेक्टर जनरल बलराम भार्गव (Dr Balram Bhargava) म्हणाले की, कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वायू प्रदूषणही मोठी भूमिका बजावत आहे. महत्त्वाचे म्हणजे पंजाब आणि हरियाणासारख्या शेजारच्या राज्यात, पेंढा जळणे आणि इतर अनेक कारणांमुळे दिल्लीतील हवा खूपच खराब झाली आहे. शास्त्रज्ञांनी एका नवीन अभ्यासात असा दावा केला आहे की, जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 15 टक्के मृत्यूंचा संबंध हा दीर्घकाळ वायू प्रदूषण असलेल्या वातावरणात राहण्याशी आहे.
याचा अर्थ असा आहे की दर सातपैकी एका रुग्णाच्या मृत्युच्या मागे वायू प्रदूषण देखील काही प्रमाणात जबाबदार आहे. पत्रकार परिषदेत बलराम भार्गव यांनी युरोप आणि अमेरिकेत झालेल्या अभ्यासांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या अभ्यासांमध्ये संशोधकांनी प्रदूषित भागाच्या डेटाची तुलना लॉकडाऊन दरम्यान झालेल्या मृत्यूशी केली. यामध्ये त्यांना कोरोना रुग्ण मृत्यूमागे वायू प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचे दिसून आले. संशोधकांना आढळले आहे की, यूरोपमध्ये कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूमध्ये 19 टक्के, उत्तर अमेरिकेतील मृत्यूंपैकी 17 टक्के आणि पूर्व आशियातील मृत्यूंपैकी 27 टक्के प्रकरणांचा संबंध वायू प्रदूषणाशी आहे.
'कार्डिओव्हस्कुलर' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे विश्लेषण केले आहे/ जगातील विविध देशांमध्ये वायू प्रदूषणाचा आणि कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा शोध घेण्यात आला. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Central Pollution Control Board) आकडेवारीनुसार, आनंद विहारमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 377 आहे, जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा समजला जातो. या व्यतिरिक्त, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीची (Delhi Pollution Control Committee) आकडेवारी दर्शवत आहे की, वायु गुणवत्ता निर्देशांक रोहिणीमध्ये 346, आरके पुरममध्ये 329, मुंडका येथे 363 आहे. या सर्व भागातील हवेची स्थिती 'अत्यंत वाईट' आहे.