Road Accident

Accidents on Indian Roads: डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री एका इनोव्हा कारच्या रस्ते अपघातामध्ये (Road Accidents) 6 जणांचा जीव गेला, त्यानंतर रस्ते अपघातांबाबतची चिंता आणखी वाढली आहे. देशात रस्ते अपघाताच्या अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यात अनेक `लोकांना आपला जीव गमवावा लागतो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये गेल्या 10 वर्षात रस्ते अपघातात किती लोकांना आपला जीव गमवावा लागला याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये अपघातांच्या बाबतीत टॉप-5 राज्ये कोणती आहेत हेही सांगण्यात आले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान यांचा नंबर लागतो.

रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, गेल्या 10 वर्षांत (2014-2023) सुमारे 15.3 लाख लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. हे प्रमाण चंदीगडसारख्या केंद्रशासित प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्याआधीच्या दशकात (2004-2013) देशात रस्ते अपघातात 12.1 लाख मृत्यूची नोंद झाली होती.

भारतात दर 10 हजार किलोमीटरवर रस्ते अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दर 10,000 किलोमीटरवर सुमारे 250 आहे. अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा आकडा अनुक्रमे 57, 119 आणि 11 आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 15.9 कोटी होती. पुढील 11-12 वर्षांत वाहनांची संख्या दुपटीने वाढली आहे. (हेही वाचा: Bus Driver Dies While Driving: बेंगळुरू येथे प्रवाशांनी भरलेली बस चालवताना चालकाला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, समोर आला धक्कादायक व्हिडिओ)

यंदा 2024 पर्यंत सरकारी डेटामध्ये सुमारे 38.3 लाख वाहनांची नोंदणी झाली होती. या काळात त्या प्रमाणात रस्ते वाढले नाहीत. 2012 मध्ये भारतीय रस्त्यांची एकूण लांबी 48.6 लाख किलोमीटर होती, तर 2019 पर्यंत ती केवळ 63.3 लाख किलोमीटरवर पोहोचली आहे. रस्ते सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करूनही देशात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे.