Covid-19 चा संसर्ग झालेल्यांवर Covaxin चा एक डोसही प्रभावी; दोन डोस इतक्याच अँटीबॉडी झाल्या तयार- ICMR
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

सध्या देशात कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण (Vaccination) मोहीम सुरु आहे. मुख्यत्वे कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन (Covaxin) अशा दोन लसी मोठ्या प्रमाणावर दिल्या जात आहेत. लसीचे नेमके किती डोस घ्यावेत याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. आता आयसीएमआरच्या (ICMR) एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारत बायोटेकची कोरोना लस 'कोवॅक्सिन' ने एक डोस घेतलेल्या कोरोना बाधित लोकांमध्ये तितकाच Antibody Response दिला आहे, जितका विषाणूचा संसर्ग न झालेल्या लोकांना दिलेल्या दोन डोसद्वारे मिळाला होता.

आयसीएमआरचा हा अभ्यास शनिवारी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झाला. अहवालात म्हटले आहे की, जर या प्राथमिक निष्कर्षांना मोठ्या लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये पुष्टी मिळाली तर, पूर्वी SARS-CoV-2 चा संसर्ग झालेल्या लोकांना BBV152 लसीचा एकच डोस दिला जाऊ शकतो, जेणेकरून मर्यादित लस साठ्यामध्येही जास्त लोकांचे लसीकरण केले जाऊ शकते. भारतातील पहिली स्वदेशी कोरोना विषाणू लस Covaxin चे BBV152 असे कोडनेम आहे. या लसीला जानेवारीमध्ये आपत्कालीन वापरासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली.

ही दोन डोसची लस 4-6 आठवड्यांच्या अंतराने दिली जाते. अभ्यासात, कोविड-19 संसर्ग असलेल्या लोकांच्या अँटीबॉडी प्रतिसादाची तुलना अशा लोकांशी केली गेली ज्यांना कधीही कोरोना संसर्ग झाला नाही. फेब्रुवारी ते मे 2021 दरम्यान चेन्नईमधील लसीकरण केंद्रांवर BBV152 लस घेणारे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. या अभ्यासाला ICMR-NIRT च्या आचार समितीने मान्यता दिली आहे. (हेही वाचा: Corona Virus Update: लसीमुळे कोरोना मृत्यूची संख्या झाली कमी, आयसीएमआरने केला दावा)

अँटीबॉडीची पातळी तीन टाइम पॉइंट्सवर मोजली गेली. (1) लसीकरणाच्या दिवशी (बेसलाइन), (2) पहिल्या डोसनंतर एक महिना आणि (3) पहिल्या डोसनंतर दोन महिन्यांनी. दोन अपवाद वगळता, पूर्व-कोविड संसर्ग असलेल्या जवळजवळ सर्व लोकांमध्ये लसीकरणाच्या वेळी शोधण्यायोग्य प्रतिपिंडे आढळली. मात्र हा पायलट अभ्यास असल्याचे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ लोकेश शर्मा म्हणाले.