Assam Floods: आसाम मध्ये पुरामुळे हाहाकार; आतापर्यंत 59 लोकांचा मृत्यू, 30 जिल्ह्यातील 45,40,890 लोकांना बसला फटका
Assam Floods (Photo Credits: IANS)

आसाम (Assam) मधील पुराची (Flood) स्थिती आता आणखी धोकादायक बनत चालली आहे. पुरामुळे मंगळवारी आणखी आठ जणांचा बळी गेला व यासोबतच एकूण मृतांची संख्या 59 झाली आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमध्ये पूर-संकट निर्माण झाले आहे. नद्यांची पातळी वाढल्याने राज्यातील मोठ्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की, 14 जुलै पर्यंत आतापर्यंत पूरामुळे 59 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 30 जिल्ह्यातील 45,40,890 लोकांना याचा फटका बसला आहे.

गेल्या चार आठवड्यांत विश्वनाथ, तीनसुकिया, लखीमपूर, बोंगागांव, कामरूप, गोलाघाट, शिवसागर, मोरीगाव आणि इतर जिल्ह्यात मिळून 59 लोक मरण पावले आहेत. यासह 22 मेपासून भूस्खलनात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी धुबरी आणि मोरीगाव येथे पाण्यात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील ब्रह्मपुत्रेसह आठ नद्यांनी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. एएसडीएमएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या पुरामध्ये 3,371 गावे बुडून गेली आहेत आणि सुमारे 33 लाख लोकांना याचा फटका बसला आहे.

पुरामुळे राज्यातील 28 जिल्ह्यांमधील 128.495 हेक्टर जमीन पाण्यात बुडून गेली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांना आपत्तीपासून वाचवण्यासाठी 24 जिल्ह्यांमध्ये 517 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी 44,000 लोकांना ठेवण्यात आले आहे. या पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 80 टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. पुरामुळे आतापर्यंत 66 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 170 प्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.

(हेही वाचा: भाजप मुख्यालयानंतर बिहारच्या राजभवनात कोरोना व्हायरसचा शिरकाव; तब्बल 20 जणांना झाली लागण)

राज्यातील अनेक ठिकाणी नद्यांचा पुरामुळे रस्ते, पूल व इतर बांधकामांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे मोठ्या संख्येने लोकांच्या घरांची पूर्णपणे किंवा अंशत: हानी झाली आहेत. किमान 20.11 लाख प्राण्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.