गेल्या काही महिन्यांपासून जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीला अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला आहे. कर्जामुळे कंपनीचे अक्षरशः दिवाळे निघाले असताना, कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल (Naresh Goyal) आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशात कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप थकवल्यामुळे सोमवारी (15 एप्रिल) सकाळी 10 वाजल्यापासून उड्डाणे थांबविण्याचा निर्णय जेटच्या कर्मचाऱ्यांनी घेतला होता. मात्र, सोमवारी जेटच्या व्यवस्थापनामध्ये व स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये महत्त्वाची बैठक होणार असल्याने वैमानिकांनी संपाचा निर्णय पुढे ढकलला आहे.
जेट एअरवेज आर्थिक अडचणीत आल्याने जानेवारीपासून त्यांच्या वैमानिकांचा पगार थकला आहे. त्यामुळे नॅशनल एव्हिएटर्स गिल्डशी संबंधित असलेले कर्मचारी उड्डाणे बंद करणार असल्याचे गिल्डकडून सांगण्यात आले होते. मात्र तूर्तास तरी हे आंदोलन टळले आहे. नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर जेट एअरवेजचा ताबा स्टेट बँक आॅफ इंडियाकडे गेला आहे. त्यांनी 1500 कोटी रुपये देऊन कंपनीला आर्थिक साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बँकेकडून अद्याप हे सहाय्य मिळाले नसल्याने हा संपाचा निर्णय घेण्यात आला होता.
याआधी 1 एप्रिलपासून काम बंद करण्याचा इशारा यापूर्वी गिल्डने दिला होता, मात्र 31 मार्च रोजी झालेल्या बैठकीत 1 एप्रिलपासून काम बंद आंदोलन करण्याऐवजी 14 एप्रिलपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या मुदतीदरम्यानही कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. जेटच्या एकूण 1600 वैमानिकांपैकी सुमारे 1100 वैमानिक यामध्ये सहभागी होतील, असा दावा चोप्रा यांनी केला होता. (हेही वाचा: 'जेट एअरवेज' ची उड्डाणे सोमवार पासून थांबवणार, कर्मचाऱ्यांचे वेतन थकवल्यामुळे 1100 वैमानिकांनी घेतला निर्णय)
जेट एअरवेज सध्या एक अब्ज डॉलर (सुमारे 6895 कोटी) इतके कर्ज आहे. जेट एअरवेजच्या डोक्यावर सध्या एकूण 26 बँकांचे कर्ज आहे. त्यातील काही बँका खासगी आहेत तर काही बँका विदेशी आहेत. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओव्हरसीस बँक, इलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचेही जेट एअरवेजवर कर्ज आहे. आता या यादीत एसबीआय आणि पीएनबीचे नावही जोडले गेले आहे.