Army Day 2019: 15 जानेवारीला का साजरा केला जातो भारतीय सेना दिवस?
के. एम. करिअप्पा (File Photo)

Army Day 2019:  दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा केला जातो. स्वतंत्र भारतचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना 'फिल्ड मार्शल' या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिल्ली व सेनेच्या सर्व मुख्यालयात हे कार्यक्रम पार पडतात.

28 जानेवारी 1899 मध्ये कर्नाटकच्या कुर्गमध्ये शनिवर्सांथि येथे करिअप्पा यांचा जन्म झाला. त्यांच्या परिवारातील लोक प्रेमाने त्यांना 'चिम्मा' म्हणत. करिअप्पा यांनी 20 वर्षांचे असताना त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत नोकरी करायला सुरुवात केली. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला प्रारंभ केला. करिअप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात भरीव कामगिरी केली. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्तानेच दरवर्षी 15 जानेवारीला 'सेना दिवस' साजरा केला जातो.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर करिअप्पा यांच्यावर दोन्ही देशांत सेनेची विभागणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. करिअप्पा 1953 मध्ये सेनेतून निवृत्त झाले. सैन्यात असताना त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे ते एक महान सैनिक ठरले.

निवृत्तीनंतर कर्नाटकमध्ये करिअप्पा राहू लागले. दरम्यान 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली. त्यावेळेस त्यांचा मुलगा के. सी. नंदा करिअप्पा भारतीय वायुसेनेत फ्लाईट लेफ्टिनेंट होता. युद्ध काळात त्यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला आणि पाक सैनिकांना कंठस्नान घातले. नंदा यांनी विमानातून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला पण पाक सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यावेळेस पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान होते. अयुब खान हे स्वतंत्र्यपूर्व काळात करिअप्पा यांचे जूनियर होते. करिअप्पा यांचा मुलगा नंदा पकडला गेल्यानंतर अयुब खान यांनी करिअप्पा यांना फोन करुन सांगितले की, "तुमच्या मुलाला सोडत आहे." त्यावर करिअप्पा यांनी मुलाच्या प्रेमाचा त्याग करत सांगितले की, "तो फक्त माझा मुलगा नाही तर भारतमातेचा मुलगा आहे. त्याला सोडत असाल तर कोणत्याही सुविधा देऊ नका. तसंच सर्व बंदिवासांना सोडा किंवा कोणाच नको." मात्र युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानने सर्व बंदिवासांना मुक्त केले.